• Mon. Nov 25th, 2024
    Weather Update: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसं असेल वातावरण, उद्याचं मुंबई-पुण्यातील  हवामान अपडेट

    मुंबई: राज्यात आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना गमवावा लागला आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, अनेक भागात जोरदार पाऊस बरसला, तर काही ठिकाणी फक्त आभाळ भरुन आलं. पुणे शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या हलक्या सरी बसल्या होत्या. ढगाळ वातावरणासह शहरभरात तसेच ग्रामीणमध्ये आज पाऊस झाला. ठाणे आणि परिसरात ढगाळ वारावरण होतं तर काही ठिकाणी वादळी वारा वाहला.

    IMD मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये २४ तासांत ढगाळ वातावरण असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनक्रुमे ३४ ते २८ अशं सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाने सांगितलं.

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या म्हणजेच सोमवार ५ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाडा विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    Odisha Accident: कोरोमंडल १२८ च्या वेगाने धडकली अन् डबे पत्त्यासारखे विखुरले; रेल्वेने सांगितलं अपघाताचं कारण
    राज्यात कुठे कुठे पाऊस झाला?

    जालना जिल्ह्यात आज दुपारी एकच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला. त्यानंतर तुफान वादळ-वारे वाहू लागले. या वाऱ्याचा वेग भयंकर असल्याने रस्त्यांवरील झाडे मुळापासून उन्मळून पडल्याचे चित्र पहायला मिळाले. काही भागात शेतातील विद्युत पुरवठा करणारे खांब कोसळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. पाऊस रिमझिम स्वरूपाचा झाल्याने निर्माण झालेल्या उकाड्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. जालना, मंठा, परतूर, अंबड, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन सह घनसावंगी तालुक्यातील अनेक भागात असेच चित्र निर्माण झाले आहे.

    जाफराबाद तालुक्यात तासभर वादळी वारा व ढगाळ वातावरणाने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले. आकाशात धुळीचे लोट दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होते. दीड वाजेच्या सुमारास भर ऊन असताना अचानक वादळी वारा सुरू झाला. वाऱ्याचा वेग इतका होता की ग्रामीण भागात बऱ्याच घरांवरील पत्रे उडाली. जनावरांचे गोठे पडले, रस्त्यावरील होर्डिंग्ज व झाडे जमीनदोस्त झाली. जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णीसह परिसरात दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातारण तयार झाले होते. सध्याच्या स्थितीत परिसरातील शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू असून नांगरणी, वखर पाळी, रोट्याव्हेटर सह पेरणी पूर्व मशागतीची आदी कामे सुरू आहे. अशातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याची तारांबळ उडाली होती.

    जालन्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, समृद्धी महामार्गावर वाहतूक खोळंबली
    जळगाव जिल्ह्यात रविवारी दुपारी आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. अचानकच्या वादळीवाऱ्यामुळे मोठी दाणादाण उडाली होती. यावेळी जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी या तुफान वादळी वारा आणि विजांचा कडकडाटासह अर्धा तासापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळून नुकसान झाले आहे. दुसरीकडे पाचोरा शहरातही एका कंपनीची एका बाजूची भिंत कोसळली तर भुसावळ शहरातही एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी, सिमेंटचे ब्लॉक पडला. या दोन्ही घटनांमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. जळगाव शहरात वादळी वाऱ्यामुळे एका घराचा स्लॅब कोसळला. यात एक वृद्ध जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    राज्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याचे समोर आले आहे. पाचोरा तालुक्यातील सांगवी बोरा एवढ्या गारा पडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान वादळी वारा आणि पाऊस यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान बुलडाणामध्ये खामगाव तालुक्यासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. धुळ्यात सकाळपासून ढगाळ वातावरण झाले आहे. यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. धुळे शहरात अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहे.

    झाडं कोलमडली, विजेचे खांब पडले, घरांची पडझड; मनमाड परिसरात तुफान वादळ

    धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावताच भले मोठे झाड उन्‍मळून पडले. या लिंबाच्या झाडाखाली उभ्‍या असलेल्‍या कारवर झाड पडल्‍याने गाडीचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

    धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री तालुक्यांतील काही भागांत गारांसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे टोमॅटो आणि अन्य पिकांनाही फटका बसणार आहे. अनेक जणांच्या शेतात कांदा काढून ठेवला असून, तो देखील सडण्याची शक्यता आहे. पूर्व भागात देखील काल रात्री अचानक आलेल्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या व काढणीस आलेल्या बाजरीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली. या पावसामुळे तरकारी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसह कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed