• Sat. Sep 21st, 2024

नातेवाईक शरीरसुखाची मागणी करतोय, पोलिसांची वाईट वागणूक, अजितदादांच्या ऑफिसमधून फोन गेला अन्…

नातेवाईक शरीरसुखाची मागणी करतोय, पोलिसांची वाईट वागणूक, अजितदादांच्या ऑफिसमधून फोन गेला अन्…

बारामती, पुणे : एका नातेवाईकाकडून शरीरसुखाची मागणी होत आहे, या अत्यंत गंभीर तक्रारीसाठी गेलेल्या प्रौढ विधवा महिलेला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात वाईट वागणूक देण्यात आली. ‘समोरच्या पार्टीला तुमच्यावर तक्रार करायला लावतो मग तुमची तक्रार घेतो’, अशी तंबीही दिली गेली. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या स्वीय सहायकाने सांगितल्यावरच तक्रारीचे दोन तासांचे दिव्य पार पडले.

अत्यंत गरीब घरातील महिलेने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार कथन केला. ‘त्यांच्या शेजारी नातेवाईक राहतो. गेली काही वर्ष तो वाईट पद्धतीने डोळा ठेवून आहे. तो शरीरसुखाची मागणी करत आहे. त्याचं ऐकत नसल्याने मुलांवर वेगवेगळ्या केसेस करण्याची धमकी देत आहे’, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, महिलेने पडदे बांधून तयार केलेले बाथरूम व पक्के शौचालय ज्या दिशेला आहे त्याच दिशेला नातेवाईकाने जाणूनबुजून दरवाजा तयार केला. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांत तात्पुरता अर्ज दिला आणि ठाणेप्रमुखांना फोन केल्यावर दोन पोलीस तातडीने पाहणीसाठी आले. पण ‘त्यांचे घर आहे कुठेही दरवाजा पाडतील तुम्हाला काय करायचे आहे?’ अशी उलटी समज पोलिसांनी दिल्याचं सदर महिलेनं सांगतिलं.

नको राजेशाही थाट, लग्नाच्या अनावश्यक खर्चाला काट, दौंडच्या नवदाम्पत्याचा आदर्श निर्णय
मग महिलेनं दुपारी तीन-सव्वातीनच्या दरम्यान मुलासह पोलीस ठाणे गाठलं आणि ठाणे अंमलदारांना अर्ज दिला. ‘तुमची तक्रार घेतली जाईल. काही काळजी करू नका’, असा दिलासा त्यांनी दिला. मात्र त्यानंतर वस्तीवर पाहणीला गेलेले दोन पोलीस आले आणि नूर बदलला. एकजण म्हणाला, ‘तो विषय संपला ना मघाशीच. कशाला आलाय परत?’ त्यावर महिला आणि तिच्या मुलाने ‘तक्रार नोंदवून तर घ्या साहेब’ अशी आर्जव केली. ‘थांबा पुढच्या पार्टीला पण बोलवतो आणि तुमच्यावर केस करायला लावतो’ असं त्यावर पोलिसांनी, सुनावलं. यावर महिला व मुलाशी पोलिसांची दहा मिनिटे हुज्जत झाली. मग मुलाने रजेवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना फोन केला. त्यांनी समाधानकारक प्रतिसाद दिला आणि लगेचच ठाण्यात फोनही फिरवला. पोलिसांनी घेतो तक्रार असं सांगितलं, पण घेतली नाही.

पुण्यात १०४ वर्षांच्या आजीसह ५१ जणांचा वाढदिवस एकत्रित साजरा, अख्ख्या गावाची हजेरी

अखेर मुलाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनिलकुमार मुसळे यांना फोन केला. मुसळेंनी गांभीर्य ओळखून ‘पोलिसांकडे फोन द्या’ असं सुचवलं. पण पोलिसांनी फोन घेण्यास मात्र नकार दिला. मग मुसळे यांनीच ‘स्पीकरवर फोन टाका मी बोलतो’ असं सांगितलं. फोन स्पीकरवर टाकून पोलिसांपुढे टेबलावर ठेवला. मग पोलीस मुसळे यांच्यासमोर ‘साहेब, तक्रार घेतलीय. त्यांना बसा म्हणालोय’, असं सरळ झाले.

पण यानंतरही पोलिसाने बाहेर येत ‘तुम्ही कशाला वर फोन करत चाललाय’ असा ढोस मुलाला दिला. मुलाने ‘आमच्या नेत्याकडे नाही तर कुठे जाणार’ असं उत्तर दिलं. दोन तासांच्या या नाट्यानंतर मुलांना बाहेर काढलं आणि संबंधित महिलेला एकटीला आत बोलवलं. महिला पोलिसांच्या समक्ष तक्रार घेतली. यानंतरही दोन-अडीच तास थांबा, असं सुनावलं. मात्र महिला परतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed