या मंदिरात अंबाबाईसह अनेक छोटी मोठी मंदिर आहेत. तसेच वडाचे झाड देखील आहे. यामुळे आज वटपौर्णिमेनिमित्त अंबाबाई मंदिर परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात मंदिरात आल्या होत्या. यावेळी मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पूजा सुरु असतानाच वडाच्या झाडाने अचानक पेट घेतला.
दरम्यान महिला या झाडाखाली मोठ्या प्रमाणात कापूर आणि उदबत्ती लावून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत होत्या. याचवेळी बांधलेल्या दोऱ्याला अचानक आग लागली. या अचानक लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मंदिर परिसरातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर कर्मचारी त्वरित दाखल झाले. त्यांनी लगेचच मंदिरातील अग्निरोधक मशीनच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कर्मचाऱ्यांना आग विझवताना अडचण निर्माण होत होती. मात्र 15 ते 20 मिनिटानंतर आग विझवण्यात मंदिर प्रशासनाला यश आले आहे.
तर यामध्ये झाडाचा एक भाग मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे. या घटनेनंतर सण असला तरी झाडाच्या जवळ कापूर आणि उदबत्ती लावणे महिलांनी टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.