जे. डे हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप गुन्हे पत्रकार असलेल्या जिग्ना वोरा यांच्यावर झाला. त्यांच्यावरच स्कूपची कथा बेतलेली आहे. न्यायालयानं वोरा यांची निर्दोष सुटका केली. या प्रकरणात स्वत:ला निर्दोष सिद्ध करताना वोरा यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं याची कहाणी स्कूपमध्ये आहे. त्यामुळे जागृती पाठक ही व्यक्तीरेखा साकारणारी करिश्मा तन्ना कथानकाच्या मध्यभागी आहे.
जे. डे. हत्याकांड कधी घडलं?
११ जून २०११ रोजी मुंबईत जे. डे. यांची हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी ११ जणांविरोधात आरोपपत्र तयार केलं. तीन हजार पानांच्या आरोपपत्रात शूटर सतीश कालिया, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलम शेंडगे, मंगेश आगवणे, विनोद असरानी, दीपक सिसोदिया आणि पॉल्सन जोसेफ यांच्यासह अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचं नाव होतं. जवळपास सात वर्षांनंतर मुंबईतील न्यायालयानं या प्रकरणात निकाल दिला आणि राजनसह ९ जणांना दोषी ठरवलं.
पूर्ण प्रकरण काय?
जे. डे. यांची मुंबईत दिवसाढवळ्या हत्या झाली. जून २०११ मध्ये घडलेल्या हत्याकांडानं मुंबई हादरली. सात बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.त्यात जे. डे. यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडात क्राईम रिपोर्टर जिग्ना वोरा यांचं नाव समोर आल्यानं अनेक जण चक्रावले. वोरा यांना मकोका लावण्यात आला. या प्रकरणामुळे वोरा यांचं आयुष्य बदललं. एकल पालक असल्यानं २०१२ मध्ये त्यांना जामीन मिळाला.