सागर पारेख (३१) आणि संपतराज जैन (४८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ८ फेब्रुवारी रोजी डोंबिवली पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात हे दोघे राकेश म्हामुणकर यांच्या रिक्षात बसले होते. शहाड येथील बिर्ला मंदिरात जायचे असल्याने राकेश तयार झाले. मंदिरात पोहोचल्यावर दर्शन घेऊन सागर आणि संपत हे दोघे मंदिराचा प्रसाद म्हणून पेढे घेऊन आले. या पेढ्यात दोघांनी गुंगीचे औषध मिसळले होते. राकेशने पेढे खाल्ल्यावर रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. पाठीमागे बसलेले दोघे राकेश बेशुद्ध होण्याची वाट पाहात होते. काही अंतर पुढे गेल्यावर राकेश बेशद्ध पडले. रिक्षा थांबवून दोघांनी राकेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी, एक मोबाइल व रक्कम असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून आणि राकेशला तिथेच टाकून पसार झाले. शुद्धीवर आल्यावर वस्तू चोरीला गेल्याचे राकेश यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
एप्रिल महिन्यात मिरा-भाईंदर पोलिसांनी सागर व संपत यांना अशा प्रकारच्या गुन्ह्यात अटक केली होती. या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाला पेढ्यात गुंगीचे औषध देऊन लुटल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच मिरा-भाईंदर पोलिसांनी विष्णुनगर पोलिसांशी संपर्क करून या दोन्ही आरोपींचा ताबा डोंबिवली विष्णूनगर पोलिसांना दिल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अमोल आंधळे यांनी दिली.