देशातील सगळ्यात मोठ्या प्रवासी महामंडळ असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लोकवाहिनीची गाथा सांगणाऱ्या एसटी विश्वरथाचे आज, शनिवारपासून मार्गक्रमण सुरू होणार आहे. एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्ताने रथाची बांधणी करण्यात आलेली आहे. एसटी रथाचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फुटणार होता.
१ जून १९४८ रोजी एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली. या घटनेला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने पंचकलमी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नवनियुक्त एसटी सदिच्छा दूत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. एसटीच्या पहिल्या गाडीपासून ते ई-शिवनेरी यांची प्रतिकृती, कालानुरूप झालेले बदल आणि सरकारकडून एसटीच्या माध्यमाने देण्यात येणाऱ्या योजनां यांची माहिती रथातून गावागावात देण्यात येणार आहे.
असे होते एसटीचे पंचकलमी कार्यक्रम
– २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सुरक्षित सेवा बजावणाऱ्या पाच चालकांचा सपत्निक सत्कार
– करोनानंतर दर्जेदार कामगिरी करणाऱ्या राज्यातील तीन विभांगाचा व ९ आगारांचा सत्कार.
– दूरदर्शी प्रणालीद्वारे राज्यातील बसस्थानकांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि बसस्थानक परिसराचे काँक्रिटिकरण.
– एसटी कॉफीटेबल पुस्तकाचे अनावरण
– एसटी विश्वरथाचे उद्घाटन