बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचं पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी १.३० वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. आज दुपारी २ वाजेपासून उद्या सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर उद्या दुपारी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बाळू धानोरकर यांना २६ तारखेला नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड पिता नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. आता पुन्हा अचानक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं होतं. ते ८० वर्षांचे होते. २८ मे रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यातून कुटुंब सावरत नाही तोच बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे. यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.