या ठिकाणी बसलेल्या कुटुंबीयांना सतत फोन वाजत असल्याने त्यांनी तो फोन उचलून त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी सौरवची आई विचारत होती, की सौरव कुठे आहे? कोण बोलत आहात? त्या कुटुंबीयांनी उत्तर दिले की हा मोबाईल उरमोडी धरण परिसरातील असून इथे दोन युवक पोहण्यासाठी गेले आहेत. मात्र बराच वेळ झालं ते इकडे परत आलेच नाहीत आणि पाण्यातही दिसत नाहीत. हे ऐकून सौरवची आई पुरती घाबरली व तिने आरडाओरडा करतच इतर सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ सौरवचा मोठा भाऊ गौरव व काही मित्र घटनास्थळी आले.
त्यांनी परिसरात पाहणी केली, मात्र काहीही आढळून आले नाही. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यांनी ही कल्पना शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला दिली. मात्र तोपर्यंत साडेसात ते आठ वाजून गेले होते. रेस्क्यू टीमने सांगितले की, आम्ही सकाळी लवकर येतो आता फार रात्र झाल्याने शोध कार्य घेता येणार नाही.
सकाळी लवकर स्थानिक ग्रामस्थ, कातकरी समाजातील काही व्यक्ती व कुटुंबीयांनी शोध मोहीम घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर नऊच्या दरम्यान रेस्क्यू टीमचे काही सदस्य दाखल झाले. मात्र, त्यांनाही मृतदेह सापडला नाही. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनीही स्वतः बोटीत चढून शोध कार्य घेतले. मात्र, त्यांनाही यश आले नाही. नंतर अंबवडे येथील काही युवकांनी शर्तीचे प्रयत्न करून एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तो मृतदेह आकाश रामचंद्र साठे या मुलाचा होता. हा मृतदेह सकाळी बाराच्या दरम्यान सापडला.
यानंतर सातारा येथील काही कातकरी व्यक्ती तसेच कुटुंबीयांनी शोध मोहीम सुरूच ठेवली होती. यावेळी पाऊसही पडत होता. सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान दुसरा मृतदेह ही शोधून काढण्यास यश आले. या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद तालुका पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.