• Sat. Sep 21st, 2024
शिंदे-फडणवीसांनी सावरकर जयंतीसाठी अहिल्यादेवी, सावित्रीबाईंचे पुतळे हटवले? फोटो व्हायरल

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. मात्र दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्य सरकारकडून सावरकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेला कार्यक्रम वादात सापडला आहे. कारण सावरकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी सरकारने अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसंच याबाबतचा फोटोही रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे.राज्य सरकारविरोधात हल्लाबोल करताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही,’ अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

राजकारण केलं तर पवार आजोबा-नातवाला पश्चाताप करण्याची वेळ आणू : गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकरांनाही घेरलं

भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांना विविध प्रश्नांवरून घेरत असतात. विशेषत: अहिल्यादेवी होळकर यांच्यासंबंधीच्या अनेक मुद्द्यांवरून पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी इथे काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला पडळकर यांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सदनात झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोहित पवार यांनी पडळकरांना खिंडित गाठण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय महाराष्ट्र सदनातील घटनेवर गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत ते दाखवतील का?’ असा बोचरा सवाल रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता केला आहे.

दरम्यान, रोहित पवार यांच्या या आरोपांवर आता राज्य सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात येतं, तसंच गोपीचंद पडळकर हेदेखील काही पलटवार करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed