उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे रोजी सकाळी १० वाजता चाचणी होणार आहे. यासाठी होणाऱ्या कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी महसूलमंत्र्यांनी यावेळी केली. येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही दौरा होण्याची शक्यता लक्षात घेवून त्याचेही नियोजन आतापासूनच सुरू करण्याबाबतही सूचनाही महसूलमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.
अकोले व संगमनेर तालुक्यातील सर्व कालव्यांची पाहणी करीत महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. धरणासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना गायरान जमिनी देण्यात आल्या होत्या. या जमिनीच्या बाबतीत अद्यापही प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असल्याने याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविणाच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर घेवून न्याय मिळवून देण्याची ग्वाही विखे पाटील यांनी यावेळी दिली.
कालव्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. मात्र, त्यांची तारीख निश्चित होत नाही. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू झाल्यावर पाणी सोडून उपयोग नाही. त्यामुळे सध्या पाणी सोडण्यात यावे आणि पंतप्रधान मोदी यांची तारीख मिळेल तेव्हा सवडीने औपचारिक उद्घाटन करण्यात यावे, अशी सूचना थोरात यांनी केली आहे.
त्यानंतर आता चाचणीच्या निमित्ताने कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. ३१ मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी फडणवीस नगर जिल्ह्यात येणार आहेत. त्याला जोडूनच हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे थोरातांची सूचना मान्य झाली, अशी चर्चा संगमनेर तालुक्यात आहे.