१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे असाच राजदंड सोपवण्यात आला होता. या नंतर आता पुन्हा ७५ वर्षानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही रविवारी होणाऱ्या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी असाच राजदंड सोपवण्यात येणार आहे. राजदंड धारण करण्याची पद्धत भारतात प्राचीन काळापासून आहे. राजदंडाला तामिळ भाषेमध्ये सेंगोल संबोधण्यात येत असे. चोल वंशाचे राजे सेंगोल वापरत होते.
त्याकाळात एक राजा दुसऱ्या राजाला सत्ता हस्तांतरित करताना राजदंड सोपवत असत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वरवाडी या गावात श्री चक्रेश्वर मंदिर आहे. या मंदिरात प्राचीन काळातील सूरसुंदरीची भग्न मूर्ती आहे. आणि या मूर्तीच्या हातात छातीजवळ धरलेला राजदंड आहे. जो की नवीन संसदेत स्थापन करण्यात येणाऱ्या राजदंडाशी मिळताजुळता आहे. या राजदंडाचे छायाचित्र कोल्हापुरातील मूर्ती अभ्यासक उमाकांत रांनिंगा आणि प्रसन्न मालेकर यांच्याकडे आहेत.
करवीर महात्म्याचा अभ्यास करताना २००३ मध्ये या अभ्यासकांना राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडीतल्या मंदिरात सुरसुंदरीची भग्न अवस्थेत असलेली मूर्ती सापडली होती. ही मूर्ती सुमारे दीड ते दोन फुटांची असून हातामध्ये छातीजवळ राजदंड धरलेल्या अवस्थेत आहे.चक्रेश्वरवाडीतील प्राचीन शिवमंदिर बाराव्या शतकातील असून ही मूर्ती सध्या भग्न अवस्थेत आढळून आली आहे. राजदंडालाधारण करणारी स्त्री असल्याने सार्वभौम सत्तेचे पुरावे करवीर नगरीत पाहायला मिळतात. यामुळे नव्या संसद भवनातील राजदंड आणि कोल्हापुरातील हा राजदंड यामुळे कोल्हापूरच्या चक्रेश्वर गाव पुन्हा चर्चेत आले आहे.