उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा आणि त्यानंतर लगेच पावसाळ्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असते. डेंगीच्या रुग्णांना ‘प्लेटलेट’ द्यावे लागतात. त्यामुळे दर वर्षी पावसाळ्यात रक्त आणि ‘प्लेटलेट’ची मागणी वाढत असते. त्यामुळे दर वर्षी उन्हाळा आणि पावसाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. दर वर्षी तुटवडा निर्माण होऊ नये, म्हणून रक्तसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे रक्तदान चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
रक्तदान करण्याचे आवाहन
पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसळगी म्हणाले, ‘दर वर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो, त्यामुळे यंदा एप्रिलमध्ये जास्त शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सध्या पुढील दहा ते पंधरा दिवस पुरले एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.’ ससून रुग्णालय रक्तपेढीचे प्रमुख डॉ. सोमनाथ खेडकर यांनी सांगितले, ‘एप्रिलपासून शिबिरांची संख्या कमी झाली आहे. सध्या ५०० रक्त पिशव्या शिल्लक आहे. सध्याच्या मागणीनुसार हा रक्तसाठा पंधरा दिवस पुरले असा अंदाज आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे.’
शिबिरांची संख्या कमी झाली आहे. रक्तपेढ्यांकडे जून मध्ये शिबिरांचे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे; तसेच पावसाळ्यात साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असते. त्यामुळे जूनमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. शिबिर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संघटनांनी शिबिर घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.- राम बांगड, अध्यक्ष, ‘रक्ताचे नाते’ ट्रस्ट
उन्हाळ्यात का जाणवतो तुटवडा?
– सुट्ट्यांमध्ये शस्त्रक्रियांचे नियोजन केले जाते.
– सुट्ट्यांमुळे शिबिरांचे संख्या कमी होते.
– गंभीर आजारांचे रुग्ण उपचार घेण्यासाठी बाहेरगावाहून रुग्ण शहरात येतात.
– उन्हाळामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटते.
दर (रुपयांमध्य़े )
(प्रतिपिशवी ३५० मिली)
सरकारी रक्तपेढी – ११००
खासगी रक्तपेढी – १५५०