विरोधी पक्षांच्या नेत्यांपैकी एकही राष्ट्रीय नेता नाही. २०१९ मध्येही हे सर्व एकत्र आले होते, परंतु त्यावेळीही काहीही फरक पडला नाही. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींनी नगरला सभा घेतली तर ती ऐकायला कोणी येणार नाही. अशाच पद्धतीने शरद पवार मणिपूरला गेले व अखिलेश यादव चेन्नईला गेले तरी त्यांनाही असाच अनुभव येईल. मात्र, दुसरीकडे, हे लोक ज्यांना विरोध करतात, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात जिथे कुठे जातील, तेथे त्यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी गर्दी होते. त्यांना विरोध करणारे सर्व नेते हे राज्याचे नेते आहेत व ते राष्ट्रीय नेते बनू पाहत आहेत, परंतु त्यांनी आधी त्यांचा एकच नेता ठरवावा तरच त्यांना थोडीफार तरी मते मिळतील, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
राज्यात सरकार बदलल्यावर निर्णय प्रक्रियाही बदलली आहे व राज्यातील युती सरकारने विकास कामांना चालना दिली आहे, असा दावा करून फडणवीस यांनी मागील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांत नवभारताची निर्मिती केली व त्यांचे नेतृत्व जगात सर्वमान्य झाले, हे देशवासीयांना अभिमानाचे आहे. त्यांना आता पुन्हा पंतप्रधान करायचे असून त्यानंतरच्या पाच वर्षात भारत महाशक्ती बनेल, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.
भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येणारे एक वर्ष पक्षासाठी व देशासाठी द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे देव, देश व धर्मासाठी सर्वस्व त्यागावे असे आवाहन केले होते, त्याप्रमाणे स्वराज्य व स्वर्णिम भारत निर्मितीसाठी सर्वांनी येणारे वर्ष पक्षाला द्यावे आणि केंद्र व राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे व बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात उपस्थित होते.