नागपूर : निकालाच्या दिवशी पालक आपल्या मुलाचा निकाल पाहण्यासाठी उत्सुक असतात. संपूर्ण वर्षभर ते दहावी-बारावीच्या पाल्याची काळजी घेत असतात. त्याची अभ्यासाची तयारी करुन घेत असतात. कारण, निकाल हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा आणि मोलाचा क्षण असतो. मात्र, यंदा नागपुरात दोन मुलींना असा निकालाचा क्षण अनुभवायला मिळालाय, जो निकाल ऐकून त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण, त्यांची आई स्वतः बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. शुभांगी खुबाळकर असं त्यांच्या आईचं नाव आहे.कौटुंबिक परिस्थिती आणि लग्नामुळे शिक्षण सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी नाही. संसाराचा आनंद लुटत आणि मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत दिवस निघून जातात. मात्र जिद्दीने अपूर्ण शिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांची संख्याही कमी नाही. शुभांगी या त्यापैकीच एक. शुभांगी यांच्या घरची परिस्थिती दयनीय आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. त्यांना नववीपर्यंतच शिकता आलं. नंतर लग्न झाल्याने शिक्षण अर्ध्यावरच राहिलं. लग्नानंतर मुलींना जन्म दिला. नंतर त्या संसारात रमल्या. नंतर मुलींचं पालनपोषण, त्यांचं शिक्षण यातच वर्षांमागून वर्ष गेली. मग मात्र आपण अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करायला हवं, असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी बाहेरुन बारावीची परीक्षा दिली. अन् काल लागलेल्या बारावीच्या निकालात त्यांना यश मिळालं.
शुभांगी या जयाबाई चौधरी ज्ञानपीठ नावाच्या कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करतात. पती गजेंद्र हे कंडक्टर आहे. शुभांगीला प्रांजली आणि खुशी अशा दोन मुली आहेत. या दोन्ही मुली एकाच शाळेत शिकतात. सध्या प्रांजली बी.कॉम करत असताना धाकटी मुलगी नववीत आहे.
शुभांगी या जयाबाई चौधरी ज्ञानपीठ नावाच्या कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करतात. पती गजेंद्र हे कंडक्टर आहे. शुभांगीला प्रांजली आणि खुशी अशा दोन मुली आहेत. या दोन्ही मुली एकाच शाळेत शिकतात. सध्या प्रांजली बी.कॉम करत असताना धाकटी मुलगी नववीत आहे.
प्राचार्य सुधाकर चौधरी यांनी शुभांगी यांना बारावी उत्तीर्ण होण्यासाठी प्रोत्साहन दिले. ज्या शाळेत आपल्या मुली शिकतात त्याच शाळेत त्यांनी दहावीची परीक्षाही दिली होती. यंदा त्या बारावीची परीक्षाही ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या यशाने त्या आनंदी आहेतच, पण दोन्ही मुलींसाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे त्यांच्या आईने १२ वी पास होणं…!
मोठी मुलगी प्रांजली तिच्या आईला शिकवायची. दहावी आणि बारावीच्या अभ्यासातही तिने आईला मदत केली. यासोबतच शाळेतील शिक्षक आणि इतर मुलींनीही त्यांना खूप मदत केली.