मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आम्ही यापूर्वीच्या सरकारमध्ये असलेले सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आहेत. आता फेसबुक लाईव्ह नाही, ऑनलाईन नाही” असा टोलाही त्यांनी यावेळी मागच्या उद्धव ठाकरे सरकारला लगावला. “आपले सरकार थेट फिल्डवर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे आहे. त्यामुळे आता आपल्या सरकारचे काम सुसाट वेगाने सुरू आहे. सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी शासनाच्या सगळ्या योजना आता थेट घराघरात पोहोचल्या पाहिजेत, आम्हाला हेच शासनाचे काम अपेक्षित आहे. मी मुख्यमंत्री असलो, तरी आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हे सरकार तुमचं सगळ्यांचं आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलं. तसेच शासनाच्या विविध योजनांची व स्वयंरोजगारासाठी असलेल्या उपक्रमांची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
“कोकणात चिपळूण येथील वाशिष्ठी नदीच्या समुद्रात वाहून जाणाऱ्या साठ टीएमसी पाण्यावरही आपण काम करत आहोत. हा प्रस्ताव रामदास कदम मंत्री होते तेव्हापासूनच आहे, त्यांचा पाठपुरावा होता, आपण त्याच्यावरही काम करत आहोत. कोकणासाठी प्राधिकरणाची स्थापना यापूर्वीच करण्याची घोषणा आपण केली असून त्या माध्यमातून विकासाची अनेक कामे कोकणात होतील” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. “आपले सरकार सत्तेत आल्यावर आजवरच्या कॅबिनेट बैठकांमधून ३५० निर्णय सामन्यांच्या हिताचे घेतले. शासन जनतेच्या हितासाठी निर्णय घेणारे असावे लागते, सर्वसामान्यांसाठी असलेले ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. ४२ कोटी ५७ लाखांच्या निधीचा लाभ आपण आजच्या रत्नागिरी येथील कार्यक्रमातून सुमारे वीस हजार लाभार्थ्यांना दिला आहे. शासनाच्या सगळ्या योजना घरोघरी गेल्या पाहिजेत, शासनाकडे यासाठी खेटे घालण्याची गरज नाही” असे त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांच्या येथे जाऊन त्यांच्याजवळ थेट संवादही साधला.
“आपल्या सरकारने सत्तेवर आल्या आल्या ७५ हजार लोकांना शासकीय नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बेरोजगारांना डायरेक्ट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे असे आपले हे पहिले सरकार आहे. आम्ही डायरेक्ट यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये दरवेळी कॅबिनेटला बोलावतो आणि त्यांच्या हातात कामांची नियुक्ती पत्रे देतो, हे कधी कोणी बघितलं होतं का? कधीच नाही, पण आमचा उद्देश एकच आहे की सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे आणि यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देतो. आजवर सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार मेळाव्यातून नियुक्ती देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील रत्नागिरी येथील पहिल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच १९७६ साली माजी मुख्यंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे अपग्रेडेशन करण्यात आले असून सर्व आवश्यक सुविधांनी सज्ज असलेल्या या इमारतीचे उद्घाटनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
रत्नागिरी येथे गुरुवारी घडलेल्या शासन आपल्या घरी या उपक्रमासाठी जिल्हाभरातून जवळपास २५ ते ३० हजार लाभार्थी उपस्थित होते. खारघरच्या कार्यक्रमाचा मागचा दुर्दैवी अनुभव लक्षात घेऊन या कार्यक्रमाला भव्य मंडप व्यवस्था, प्रत्येक खुर्चीवर पाण्याची बॉटल, ओआरएस पाकीट, कुलरची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था पालकमंत्री उदय सामंत त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या. या सगळ्या उत्तम व्यवस्थेबद्दल मुख्यमंत्र्यांनीही पालकमंत्री उदय सामंत यांचे कौतुक केलं.
या कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थ्यांना टू व्हीलर, शेतकऱ्यांना विविध आधुनिक तंत्रज्ञानाची कृषी अवजारे यांचे वाटप करण्यात आले. तसेच महिला बचत गटांनाही विविध वस्तूंचे वाटप स्वयंरोजगारासाठी करण्यात आले.