के पूर्व विभागातील काही ठिकाणी पुनर्विकास झालेल्या इमारतींमध्ये पालिकेच्या कोट्यातील नऊ सदनिका होत्या. त्यापैकी सात सदनिका पालिकेला न कळविता विकासक आणि त्याच्या इतर साथीदारांनी परस्पर विकल्या. ताबा पत्र घेऊन सदनिका खरेदी करणारे सदनिकांमध्ये गेले त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. त्यावेळी ग्राहकांनी आपल्याकडील ताबा पत्रे दाखवली. यावर प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) के पूर्व यांची स्वाक्षरी होती. मुळात के पूर्व विभाग कार्यालयात असे पदच नसल्याने ही ताबा पत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता, पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या बनावट सह्यांचा वापर केल्याचे दिसून आले. पालिकेच्या अधिकाऱ्याने याबाबत विकासकाकडे विचारणा केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
बनावट कागदपत्र तयार करून अशाप्रकारे सदनिका विक्री म्हणजे पालिकेची फसवणूक असल्याने अधिकाऱ्यांनी याबाबत कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार केली. पालिका अधिकाऱ्यांची तक्रार आणि त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी विकासक यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची रक्कम आणि गुन्हेपद्धत पाहता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे.