उदय सामंत आणि रमेश कदम यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र यावर रमेश कदम यांनी उत्तर देणे टाळले आहे. येत्या काही दिवसात चिपळूणची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी चिपळूण येथे झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रमाकरिता उदय सामंत यांच्याबरोबर रमेश कदमही उपस्थित होते.
चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम हे मोठे प्रस्थ मानलं जातं. त्यांनी यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाकडून रायगड लोकसभेची निवडणूकही लढवली होती. चिपळूणचे आमदार असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांना मानणारा या परिसरात मोठा वर्ग आहे. त्यामुळे रमेश कदम राजकीय वाटचालीबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात उत्तर रत्नागिरीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.