• Sat. Sep 21st, 2024
Navi Mumbai News : एपीएमसीत लागला दोन हजारांच्या नोटांचा ओघ; काय असेल कारण?

दोन हजारांची नोट १ ऑक्टोबरपासून चलनातून रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला असून नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या नोटा बँकेत स्वीकारल्या जाणार असूनही अनेक नागरिक थेट बँकेत जाण्यापेक्षा दैनंदिन व्यवहारात दोन हजारांच्या नोटांचा वापर अधिक प्रमाणात करू लागले आहेत. त्यामुळे दररोज लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात सध्या या दोन हजारांच्या नोटांचा ओघ वाढताना दिसत आहे. पाचही बाजारांत या दोन हजारांच्या नोटा आता जास्त प्रमाणात दिसू लागल्या असून, येत्या काही दिवसांत त्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.अज्ञात टोळकं केळीच्या बागेत घुसलं, दोन तासांत ४ हजार झाडांची कत्तल, शेतकऱ्यावर आभाळ कोसळलं
वाशीतील घाऊक बाजारात दररोज लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात. मालाची खरेदी-विक्री होताना बँकेच्या चेकद्वारेही ‘पेमेंट’ केले जाते. तसेच, रोख व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतात. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून बाजारातून दोन हजारांची नोट गायबच झाली होती. त्यामुळे बहुतेक व्यवहार १०० ते ५०० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातूनच केले जात होते. अधुनमधून दोन हजारांच्या नोटेचे दर्शन होत होते.
मात्र या आठवड्यापासून बाजारात दोन हजारांच्या नोटेचा चलनी व्यवहारात वापर वाढताना दिसू लागला आहे. हे पाचही बाजार घाऊक बाजार असल्याने येथे लाखोंचे व्यवहारहोतात. त्यातच एखादा दुकानदार माल उचलतो तेव्हा तो किमान दहा हजारांच्या घरात आणि त्यापुढील किमतीतील माल खरेदी करतो. त्यामुळे त्याला पैसे देताना हजाराच्या हिशोबानेच द्यावे लागतात. त्यासाठी पूर्वी पाचशेच्या नोटाच व्यापाऱ्यांना दिल्या जात होत्या. कधी तरी दोन हजारांची नोट येत होती. मात्र या आठवड्यापासून अनेक व्यापाऱ्यांकडे दोन हजारांची नोट पाहायला मिळत आहे.

आरबीआयच्या निर्णयानंतर बाजारात दोन हजारांच्या नोटा व्यवहारात, बाजारात अधिक येऊ लागल्या आहेत. आंबे खरेदीसाठी येणारे सर्वसामान्य नागरिकही दोन हजारांच्या नोटा बाहेर काढू लागले आहेत. साठवून ठेवलेल्या नोटा आता बाहेर पडू लागल्या आहेत आणि बाजारात त्या दिसू लागल्या आहेत.

– संजय पानसरे, संचालक, फळ बाजार

मालाची खरेदी केल्यावर बिल भरताना पाकिटातून दोन हजारांचीच नोट काढली जात आहे. व्यापारीही त्या नोटा विनासायास स्वीकारत आहेत, अशी माहिती बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांनी दिली. बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतात. त्यामुळे येथे दोन हजारांच्या नोटेबाबत काहीच गोंधळ होत नाही. व्यापाऱ्यांना हे पैसे बँकेत जमा करायचे असतात. त्यांनाही नोटा बँकेत भरताना काही अडचणी भेडसावत नसल्याने तेही जितक्या नोटा येतात तितक्या स्वीकारत आहेत.

एपीएमसी मार्केटमध्ये पाच बाजार आहेत. येथे दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याने आमच्याकडे दोन हजारांच्या कितीही नोटा आल्या तरी आम्हाला फरक पडत नाही. हा व्यापार असल्याने आमची बँक खातीही करंट अकाऊंट आहेत. त्यामुळे आम्हाला नोटा बँकेत जमा करताना नोटांच्या संख्येची मर्यादा येत नाही. त्यामुळे जितक्या नोटा आम्हाला मिळत आहेत, त्या स्वीकारल्या जात आहेत. मागील एक ते दीड वर्षात दोन हजारांच्या नोटा फारच कमी दिसत होत्या. मात्र या आठवड्यापासून व्यवहारात दोन हजारांच्या नोटांचा वापर वाढला आहे.

– मनोहर तोतलानी, कांदा बटाटा घाऊक व्यापारी

पेट्रोल पंप, हॉटेलखर्चासाठीही प्राधान्य

शहरातील पेट्रोल पंप, मॉल, सराफ दुकाने, हॉटेलमध्येही दोन हजारांच्या नोटेचा चलनात ओघ वाढला आहे. त्यामुळे काही प्रमाणात सुट्ट्या पैशांची चणचण जाणवत आहे. नागरिकांच्या मनातही काही प्रमाणात संभ्रम असल्याने काही नागरिक बँकेत जमा करण्यापेक्षा अनेक ठिकाणी खर्च करताना दोन हजारांची नोट बाहेर काढू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed