• Mon. Nov 25th, 2024
    Amravati Accident: ज्या टेम्पोने कुटुंब चालवलं, त्यानेच घात केला; लग्नावरुन येताना चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू

    अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बाभळी परिसरातील टाटानगर येथील रहिवासी एका कुटुंबातील पाच सदस्यांवर काळाने झडप घातली. सोमवारी रात्री अंजनगाव सुर्जी येथून लग्न समारंभ आटोपून परत येत असताना त्यांच्या टेम्पोला ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेची वार्ता कळताच टाटानगर परिसरात शोककळा पसरली. नातेवाइकांचा आक्रोश अन् किंकाळ्यांनी यावेळी संपूर्ण परिसर गहिवरून गेला.

    ज्या वाहनाने त्यांचे कुटुंब चालविले, त्याच वाहनात प्रवास करत असताना मृत्यूनं त्यांना गाठलं. शेख अजहर हे आपल्या टेम्पोने कुटुंबीय आणि नातेवाइकांसह अंजनगाव सुर्जी येथे लग्न समारंभाला गेले होते. लग्न समारंभ आटोपून ते रात्रीच्या वेळी दर्यापूरला घरी परत येत होते. मार्गात ईंटकी फाट्याजवळ मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. बाभळी परिसरातील टाटानगर येथील रहिवासी शेख अजहर शेख अनवर हे मालवाहू टेम्पो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

    मालिका विश्व शोकसागरात! अभिनेते नितेश पांडे याचं निधन
    नफीसाबी शेख अनवर (४५), शेख अनस शेख असलम (२), अंशरा शेख अजहर (३), शेख अजहर शेख अनवर (३०), नासिया परवीन शेख अजहर (२४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य आठ जणांवर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासकीय सामान्य रुग्णालयातून शवविच्छेदनानंतर मृत पाचही जणांना बाभडी येथील टाटानगर येथे आणण्यात आले. यावेळी कुटुंबीय, शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून सर्वच गहिवरून आले होते.

    ज्या टेम्पोने उदरनिर्वाह करण्यात मोलाची भूमिका निभावली होती. त्याच टेम्पोने जाताना कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी पाचही जणांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली. पती, पत्नी, मुलगी, आई आणि पुतण्या अशा पाचही जणांची अंत्ययात्रा टाटानगर बाभळी येथून मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निघाली. अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दुपारी चारच्या सुमारास दफनविधी पार पडला.

    Amravati Accident: लग्नावरुन परतताना रात्री भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा करुण अंत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed