• Mon. Nov 25th, 2024
    Pune News: इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी खुशखबर; शहरात ईव्ही चार्जिंग स्थानके उभारणीला वेग

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ होत असल्याने, ‘महावितरण’कडून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानकांच्या उभारणीला वेग दिला जात आहे. पुणे परिमंडळांतर्गत सध्या १५ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानके कार्यान्वित झाली आहेत. आगामी काळात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसह लगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर आणखी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानके उभारण्यात येतील, अशी माहिती ‘महावितरण’चे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी दिली.सेनापती बापट रस्त्यावरील ‘महावितरण’च्या गणेशखिंड उपविभाग कार्यालयाच्या परिसरात नव्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानकाचे उद्घाटन रेशमे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ‘महावितरण’चे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता शंकर तायडे, सतीश राजदीप, युवराज जरग, अरविंद बुलबुले, प्रवीण पंचमुख, डॉ. सुरेश वानखेडे आदी उपस्थित होते.

    ‘राज्य सरकारने ‘ई-वाहन’ धोरणाद्वारे ‘महावितरण’ची इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ई-वाहनांचा वाढता वापर पाहता, ‘महावितरण’कडून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त चार्जिंग स्थानके उभारण्यास, त्यांना तत्पर वीजजोडणी देण्यास गती दिली जात आहे. त्यासाठी एक खिडकी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी ‘पॉवर अॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या अॅपमध्ये चार्जिंग स्थानकांची ठिकाणे, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, वीजवापर, व्यवहारासाठी ई-वॉलेट आणि शिलकीची माहिती ग्राहकांना उपलब्ध होत आहे,’ असेही रेशमे यांनी सांगितले.

    VIDEO | लाडक्या शिक्षकाची १४ वर्षांनी बदली, गावकऱ्यांकडून मिरवणूक, गुरुजींनाही अश्रू अनावर
    पुणे परिमंडळातील कार्यान्वित चार्जिंग स्थानके

    ‘महावितरण’च्या पुणे परिमंडलात १५ उपकेंद्रांच्या ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्थानके कार्यान्वित आहेत. यात संघवीनगर (औंध), रिजन्सी इन्फ्रा (ननावरे वस्ती, औंध), गणेशखिंड उपविभाग कार्यालय परिसर (सेनापती बापट रस्ता), अमर पॅरॅडियम (बाणेर), बेंचमार्क उपकेंद्र (पुनावळे, मुंबई हायवे), प्राधिकरण स्विचिंग स्टेशन (पुनावळे मुंबई-पुणे हायवे), सीआयआरटी उपकेंद्र (कासारवाडी, पुणे-नाशिक हायवे), कुणाल आयकॉन स्विचिंग स्टेशन (पिंपळे सौदागर), सेक्टर १० स्विचिंग स्टेशन (भोसरी), सीडीसी स्विचिंग स्टेशन (स्पाइन रोड, शाहूनगर), ब्रह्मा सनसिटी (वडगाव शेरी), झेन्सार स्विचिंग स्टेशन (खराडी), कीर्ती कॅसल स्विचिंग स्टेशन (वडगाव शिंदे, लोहगाव), रेसकोर्स उपकेंद्र (रेस कोर्स), राजगुरुनगर उपकेंद्र (कडूस फाटा, चांडोळी, ता. खेड) येथील चार्जिंग स्थानकांचा समावेश आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *