• Sat. Sep 21st, 2024
UPSC  Success Story: वडिलांची चहाची टपरी, आई विडी कामगार; संगमनेरच्या मंगेशची UPSC मध्ये बाजी

अहमदनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यामध्ये टॉपर होण्याची संधी मिळाली नसली तरी ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सामान्य कुटुंबातील अनेक उमेदवार आहेत. नगरच्या संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीचा मंगेश खिलारी याने ३९६ वी रँक मिळविली आहे. त्याचे वडील गावी चहाची टपरी चालवितात, तर आई विडी कामगार आहे. वडिलांना युपीएससीबद्दल ऐकून तरी माहिती आहे, आईला तर यातील काहीच कळत नाही. मात्र त्यांच्या कष्टामुळे आपण येथपर्यंत आलो आहोत. त्यामुळे निकालानंतर पहिला फोन वडिलांना केला. आता घरी जाऊन त्यांना मिठी मारणार आहे. त्यांना कधीच मिठी मारली नव्हती, आता स्वप्न पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा मिठी मारावी वाटत आहे.सुकेवाडीच्या मंगेश खिलारी याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे तो अवघ्या २३ व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण झाला. गावी त्याची शेती आहे. मात्र, फारसे उत्पन्न नाही. त्यामुळे त्याचे वडील चहाची गाडी चालवितात. आई विडी कामगार आहे. अशाही परिस्थितीत त्यांनी मंगेशचे शिक्षण पूर्ण केले. मंगशचे प्राथमिक शिक्षण गावातच झेडपीच्या शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण संगमनेर शहरात घेतले. त्यानंतर तो पुण्यात गेला. तेथे एस.पी. कॉलेजमध्ये पदवी घेतली.

मंगेश सांगतो की, त्याने दोन स्वप्न पाहिली होती. एक तर त्याला आयआयटी मध्ये जायचे होते. तर दुसरे युपीएसीची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे होते. आर्थिक अडचणीमुळे आयआयटीला जाता आले नाही. त्यामुळे त्याने मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने यूपीएससीचा मार्ग निवडला. यामध्ये मित्रांचे आणि शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले. आई वडिलांना आर्थिक भार उचलला त्यामुळे आपण हे यश मिळवू शकलो, असे मंगेश सांगतो. त्याच्या या यशाबद्दल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

मला कष्ट करण्याची जिद्द आणि आर्थिक पाठबळ माझ्या आई-वडिलांना दिले. त्यांच्याही कष्टाचे चीज झाले आहे. आमच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. लहानपणापासून वडिलांना मिठी मारण्याची इच्छा होती. ती आता गावी जाऊन पहिल्यांदा पूर्ण करणार आहे.

– मंगेश खिलारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed