या आगीत होरपळून घरातील चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे त्यात दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. आलिमुद्दिन सय्यद (३५), सलमा सय्यद (३०), आलिना सय्यद (५), फातिमा सय्यद (४) असे या आगीत होरपळलेल्या जखमींची नावे आहेत. या आगीत चौघांच्याही चेहऱ्याला, छातीला, पाठीला भाजले आहे. हे चौघेही एकाच कुटुंबातील रहिवाशी असून घर क्रमांक १ मध्ये भाडे तत्वावर राहत होते. सदर आग लागलेल घर क्रमांक १ हे बादशाह नझरुद्दिन इस्लाम तर घर क्रमांक ४ हे फरिदा मुस्ताक कुरेशी यांच्या मालकीचे आहे. या जळालेल्या दोन्ही घरातील लाकडी कपाट, कपडे, स्वयंपाक घरातील शेगडी, भांडी, पलंग, कॉम्प्युटर इत्यादी साहित्य जळून खाक झाले आहेत.
या घटनेची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त होताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. या घटनेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी, मुंब्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह व ०१-रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर २ वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सदर घटनेत अग्निशमन दलाने आगीत अडकलेल्या चारही जखमींना सुखरूप बाहेर काडून त्यांना प्राथमिक उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून या चारही जखमींना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे हलविण्यात आले आहे.