या प्रकरणी अधिक माहिती अशी की कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रस्त्याने जात असताना गावातील सतीश सुरेश शिखरे या तरुणानं तरुणीला रस्त्यात अडवले. यावेळी त्यानं अत्याचार करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने तिच्या आई-वडील धावले. आई-वडिलांनी मुलीची तरुणाच्या तावडीतून सुटका केली. यावेळी आपल्या अल्पवयीन मुलीची ३० वर्षीय तरुणानं छेड काढल्यामुळे मुलीचे वडील संतापले होते. यावेळी त्यानी विनयभंग करणाऱ्या सतीश शिखरे या तरुणाला फावड्याने बेदम मारहाण केली.
या मारहाणी मध्ये सतीश हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र या ठिकाणी उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री नऊ वाजता सतीश याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन आरोपी सतीश शिखरे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, फावड्याच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सतीश याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मुलीच्या वडिलांच्या विरोधात पिशोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या पित्याला अटक केली आहे. शुक्रवारी कन्नड येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळं गावात खळबळ उडाली होती.