पर्स चोरल्याप्रकरणी मुंबई येथील महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरीतील महिला खरेदीसाठी पुण्यातील तुळशीबागेत गेली होती. ती गल्लीतून जात असताना खांद्याला अडकवलेली पर्स चोरट्याने हिसकावली. महिलेने आरडाओरडा केला; पण गर्दीत चोरटा पसार झाला. महिलेच्या पर्समध्ये ३० हजार रुपये रोख आणि १ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने होते. दुसऱ्या घटनेत एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ३२ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली.
तुळशीबागेतील गर्दीत होणाऱ्या चोऱ्या; तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी तुळशीबागेतील अरुंद गल्ल्यांत टेहळणी मनोरे उभे करण्याचा निर्णय तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, छोटे व्यावसायिक असोसिएशन आणि विश्रामबाग पोलीस यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
व्यापाऱ्यांना मारहाण
शेतकऱ्याकडून खरेदी केलेला शेती माल टेम्पोत भरत असताना टोळक्याने मालाचे नुकसान करून व्यापाऱ्यांना मारहाण केली. मांजरी येथील अण्णासाहेब मगर उपबाजार समितीच्या आवारात हा प्रकार घडला. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाग प्रमुखाने फिर्याद दिली आहे. शेतकऱ्याकडून खरेदी केलेला शेती माल व्यापारी टेम्पोत भरत होते, तेव्हा टोळके तिथे आले. टोळक्याने व्यापाऱ्यांना धक्काबुक्की केली. एकाच्या खिशातील बाराशे रुपये हिसकावून घेतले.
पावणेतीन लाखांची घरफोडी
वडगाव बुद्रुक येथील एका सोसायटीत घरफोडी झाल्याची घटना उघड झाली आहे. चोरट्यांनी बंद सदनिकेतून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख ९० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत जगदीश धारे (वय ४४, रा. तेसज अपार्टमेंट, शांतिनगर, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारे यांचे घर तीन दिवस बंद होते. या दरम्यान चोरट्याने दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश करून चोरी केली आहे.