पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगचे (फलाट विस्तारीकरण) काम काही वर्षापासून प्रलंबित आहेत. पुणे रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनच्या ‘रिमॉडेलिंग’च्या कामाला गती दिली आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाने स्टेशनच्या रिमॉडेलिंगसाठी १०८ दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. रेल्वे बोर्डाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये पावसाळा किंवा इतर कोणत्याही गोष्टींची वाट न पाहता एका महिन्यात पुणे रेल्वे स्टेशनच्या ‘रिमॉडेलिंग’चे काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे रेल्वे प्रशासनाने ‘रिमॉडेलिंग’च्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून दिवसाला १५५ रेल्वे गाड्या धावतात. त्यापैकी ६५ गाड्या पुणे विभागातून सुटतात. पुणे विभागातून दिवसाला साधारण एक लाख २० हजार प्रवासी प्रवास करतात. ‘रिमॉडेलिंग’च्या वेळी पुणे रेल्वे स्थानकातील वाहतूक दिवसा चार तास पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्याबरोबरच काही गाड्या रद्द कराव्या लागणार आहेत. काही गाड्या हडपसर, शिवाजीनगर येथून सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ‘रिमॉडेलिंग’चे काम सुरू झाल्यानंतर साडेतीन महिने प्रवाशांना मोठा त्रास सहन कारावा लागणार आहे.
शेड हलविल्यामुळे परिणाम
‘यार्ड रिमॉडेलिंग’च्या कामासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मुंबईच्या बाजूने असलेले ट्रीपशेड (इलेक्ट्रिक इंजिन) घोरपडी येथे हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या प्रत्येक गाडीला लागणारे ‘इलेक्ट्रिक इंजिन’ घोरपडी येथून आणावे लागणार आहे. त्यासाठी १८ ते २० मिनिटे लागतील. त्यामुळे इंजिन येईपर्यंत रेल्वेची मुख्य लाइन बंद ठेवावी लागणार आहे. त्याचा फटकादेखील रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार आहे.