सध्या स्नेहवन मध्ये ५० निवासी मुलं असून खेड तालुक्यातील आळंदी जवळ असणाऱ्या कोयाळी फाटा येथे हे स्नेहवन आहे. एका कंपनीने या जोडप्याचं काम पाहून मुलांच्या आसऱ्यासाठी इमारत बांधून दिली आहे. ५० मुलांची आई होऊन त्यांचं संगोपन करणं, एकटीने एवढ्या मुलांचं जेवण तयार करणं, त्यांचा सांभाळ करणं हे सोपं काम नाही.
एका मराठवाड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने राज्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांमधील मुलामुलींना मोफत निवासासह शिक्षण देण्याचा निर्धार करत आळंदी येथील ‘स्नेहवन’ ही सामाजिक संस्था उभारली आहे. शेतकरी अशोक बाबाराव देशमाने या उच्चशिक्षित तरुणाने कष्टातून ही संस्था उभारली आहे. या संस्थेत त्यांनी पत्नीला सोबत घेऊन अशा मुलांचा सांभाळ करण्याचं ठरवलं आहे.
५० मुलांची आई होवून ते निभावणं, अशी भूमिका पार पाडत आयुष्यभर कोणतीही तक्रार करणार नाही, विशेष मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यापैकी २५ मुलांचे पालकत्व घेऊन त्यांचं शिक्षण, संगोपन केलं जातं. तसंच, नंदी समाजाच्या, स्नेहवनमधील कामगार आणि शेतकऱ्यांची मुलं आणि कचरा जमा करणाऱ्या मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यांची आई बनून २७ मुलींची जबाबदारीही घेतली असल्याचं अर्चना यांनी सांगितलं आहे.
या स्नेहवनमध्ये पहिल्यांदा फक्त मुलेच होती. मुलींना शिकवण्याची प्रेरणा अर्चना यांच्यामुळे मिळाली. कोणी महिला स्नेहवनमध्ये नसल्यामुळे मुलांचा सांभाळ करणं फार अवघड होतं. मात्र, अर्चनाशी लग्न झाल्यानंतर हे शक्य झालं. सर्व गोष्टी अर्चनाही पतीच्या खांद्याला खांदा लावून करत आहे. लग्न झाल्यापासून कुठे फिरायला जाणं, सिनेमा पाहणं, या गोष्टी वाट्याला आल्या नाहीत, असं अशोक देशमाने सांगतात. या स्नेहवन येथून शेतकरीपुत्रांना पहिली ते बारावीपर्यंत मोफत निवासी शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. आता या स्नेहवनमध्ये १०० मुलांचा सांभाळ केला जाणार आहे.