काल दुपारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आव्हाडे यांची दुपारच्या वेळेला हत्या झाली. मी या हत्येचा निषेध करतो आहे. कालच्या घटनेनंतर आज सकाळपासून सुनील शेळके नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे मी प्रसारमाध्यमांसमोर आलो. कालच्या घटनेतील आरोपी कोण आहेत, त्यांनी किशोर आवारे यांची हत्या का केली, त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे, याचा शोध पोलीस करतील. या घटनेच्यानिमित्ताने मावळ तालुक्यात राजकारणाच्या, समाजकारणाच्यानिमित्ताने वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांना यश येऊ नये म्हणून मी समंजसपणाची भूमिका घेऊन काम करत आहे. काही दिवसांपूर्वी किशोर आवारे आणि मी राजकारणात एकत्र काम केले. आमच्यात मतभेद होते, पण मनभेद नव्हते. परंतु, काही मंडळी यामध्ये जाणीवपूर्व राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जी काय सत्यता असेल ती न्यायदेवता आणि पोलीस समाजासमोर आणतील. काल संध्याकाळी जो गुन्हा नोंदवण्यात आला, त्यामध्ये मी, माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. एखाद्याची हत्या झाल्यानंतर त्याच्या परिवाराच्या भावना तीव्र असतात. पण यामागे कोण सूत्रधार आहे, हे सगळे कोण घडवत आहेत, याचा शोध आम्ही घेऊ. पुढील काळात जनतेसमोर सत्य आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे सुनील शेळके यांनी सांगितले.
काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे किशोर आवारे खाली पडले. यानंतर हल्लेखोरांनी अक्षरश: क्रुरतेचा कळस गाठला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात एकापाठोपाठ एक सपासप कोयत्याने वार केले. त्यामुळे किशोर आवारे यांच्या चेहऱ्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. या हत्येप्रकरणी मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह आरोपी शाम निगडकर आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला होता. या घटनेनंतर एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. श्याम नीगडकर, संदीप मोरे, राघू धोत्रे आणि आदेश धोत्रे अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.