जेएनपीए बंदरातून बनावट वस्तूच्या नावाखाली तस्करी करण्यात आलेली तीन कोटींची ई सिगारेट सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केली आहेत. ४० फुटी कंटेनरने पाठविण्यात आलेला ४५ हजार ८८६ ई-सिगारेटचा साठा जेएनपीए सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ताब्यात घेतल्या आहेत. या ई-सिगारेटच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन कोटी आहे.
सीमा शुल्क विभागाला गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात येणाऱ्या ई-सिगारेटची माहिती मिळाली होती. या संशयित कंटेनरची तपासणी झाली. तपासणीत पाण्याची बाटली, चुंबकीय बटण, बेल्ट बकलच्या या वस्तूच्या नावाखाली इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स आयात करण्यात आली आहेत. या संबंधी २०१९ च्या (उत्पादन, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवण आणि जाहिरात) कायद्यानुसार ई-सिगारेटची आयात प्रतिबंधित आहे. त्यामुळे ई सिगारेटचा हा साठा जप्त केला आहे. ह्या धडक केलेल्या कारवाईमध्ये तीन कोटी रुपयांचे ई सिगारेट जप्त करण्यात सीमा शुल्क विभागाला यश आले आहे.