काल सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या समोर ठेवलेला पोपट मेला आहे ते जाहीर करण्याचं काम विधानसभा अध्यक्षांवर आहे. ते विधानसभा अध्यक्ष कधी आमच्याकडे होते, राष्ट्रवादीत होते आणि आता भाजपमध्ये आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या सामर्थ्याला साजेसं नसलेलं वर्तन सत्तापिपासू लोकांकडून करण्यात येत आहे. मी माझ्या त्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला मी समाधानी आहे. शिवसेनाप्रमुख आणि मी ज्यांना भरभरुन दिलं, आपलं मानलं त्या विश्वासघातकी लोकांनी विश्वास दाखवावा हे मान्य नाही, म्हणून राजीनामा दिला. मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राची अवहेलना थांबवली पाहिजे. जसा मी राजीनामा दिला तसा या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे. एवढे सगळे धिंडवडे निघाल्यानंतर, लक्तरं वेशीवर टांगल्यानंतर निवडणुकीच्या मैदानात या, लोकशाहीत सर्वात शेवटचं न्यायालय जनतेचं असतं. आपण सर्वजण जनतेचा कौल स्वीकारुया, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांना धन्यवाद देतो. कपिल सिब्बल यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढाई लढत असल्याचं म्हटलं.
नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, देशात जो नंगानाच सुरु आहेत, त्यांच्यामुळं जी बेबंदशाही सुरु आहे. त्यामुळं देशाचे आणि मोदींच्या कारभाराचे धिंडवडे जगातील ३३ देशांमध्ये निघू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अध्यक्षांनी काही उलटं सुलटं केलं तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. त्यानंतर जी बदनामी होईल त्यानंतर त्यांना तोंड उघडायला जागा राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.