• Sat. Sep 21st, 2024
गौतमी पाटील गावात येतीये, २ दिवस सुट्टी द्या, अर्ज व्हायरल झाला पण वेगळंच सत्य समोर

सांगली : लावणी फेम गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून २ दिवसांची सुट्टी द्या, असा मजकुराचा एक रजेचा अर्ज एसटी चालकाने केला आणि हा अर्ज सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला. तासगाव एसटी आगारातील एसटी चालकाच्या नावे संबंधित अर्ज आहे. मात्र या सर्व प्रकाराची सत्यता पडताळून पाहिली असता भलताच प्रकार समोर आला आहे.गौतमी पाटलाच्या लावणीची अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ आहे. ‘जिथे गौतमी पाटलाचा शो, तिथे शो हाऊसफुल’असंच समीकरण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतंय. गौतमी पाटीलचा शो पाहण्यासाठी कोण काय करेल, याचा आता नेम राहिला नाही. कारण गौतमी पाटीलचे चाहते तिची एक अदा पाहण्यासाठी तरसत आहेत.

तिच्या एका फॅनने गौतमी पाटील गावात येणार असल्याने थेट सुट्टीसाठी अर्ज केला. तिला पाहण्यासाठी दोन दिवसांची रजा मिळावी, असा मजकूर एसटीच्या रजा अर्जावर लिहिला आहे. सदर चालक सांगलीच्या तासगाव आगारातील एसटी चालक असल्याचे या रजा अर्जावरून समोर येत आहे. २२ आणि २३ मे रोजी दरम्यान गौतमी पाटील येणार असल्याची तारीख अर्जावर आहे. सदर अर्ज सोशल मीडियावर तुफान वायरल झाला. नेटकऱ्यांमध्ये या अर्जावरून चांगलीच चर्चा सुरू आहे.

अर्ज व्हायरल झाला पण वेगळंच सत्य समोर

याबाबत तासगाव एसटी आगाराकडे संपर्क साधला असता, अशा मजकुराचा आणि कारण असलेला अर्ज एसटी विभागाकडे आलेला नाहीये. मात्र संबंधित एसटी चालकाकडून रजा मागण्यात आली होती. मात्र तशा प्रकारचा अर्ज त्याने एसटी प्रशासनाकडे अद्याप दिला नसल्याचं तासगाव एसटी आगाराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान सदरच्या अर्जाबाबतीत संबंधित चालकाशी संपर्क केल्यावर याबाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.चालकाने कोणत्याही प्रकारचा असा अर्ज लिहिला नाही, किंवा तो एसटी प्रशासनाकडे सादर देखील केला नाही. आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणाने हा अर्ज तयार करून,तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आणि त्या अर्जावर असणारी सही देखील बोगस असल्याचं संबंधित चालकाकडून सांगण्यात आलं आहे.

सदरचा अर्ज पूर्ण खोटा असून त्यावरील त्या चालकाची सही देखील बोगस आहे आणि तासगावच्या एसटी विभागाकडे असा कोणत्याही प्रकारचा रजेचा संबंधित चालकाचा अर्ज देखील आला नसल्याचा समोर आलं आहे. मात्र सदरचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed