सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात राज्यपाल महोदयांची भूमिका संशयास्पद आणि अयोग्य असल्याचे म्हटले. या निकालामुळे राज्यपालांचं वस्त्रहरण झाले आहे. आजपर्यंत राज्यपाल पद हे आदराचं होतं, पण भाजपने या यंत्रणेचे धिंडवडे काढले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यपाल पद हे अस्तित्त्वात असावे की नाही, याचाही विचार आपण केला पाहिजे. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. पण पक्षादेश (व्हिप) हा माझ्याच शिवसेनेचा असेल. त्यामुळे आता आम्ही लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांकडे तशी मागणी करु, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर…
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने तेव्हाची स्थिती आता निर्माण केली जाऊ शकत नाही, असे घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले. याविषयी उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा तुमचा निर्णय चुकला का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, माझी लढाई ही देशासाठी आणि जनतेसाठी आहे.
तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली. देशामध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. विरोधकांना एकत्र करण्याच्यादृष्टीने नितीश कुमार प्रयत्न करत आहेत. मी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचे स्वागत करतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.