• Thu. Nov 28th, 2024

    मोचा चक्रीवादळाचा परिणाम राज्यात जाणवणार का?; भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज

    मोचा चक्रीवादळाचा परिणाम राज्यात जाणवणार का?; भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः यंदाच्या वर्षातील पहिले चक्रीवादळ ‘मोचा’ हे बंगालच्या उपसागरात तयार होत असून, ते म्यानमारच्या दिशेने पुढे सरकून म्यानमार येथेच जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात वारा खंडित प्रणालीमुळे मेघर्गजनेसह पावसाचे वातावरण असल्याने चक्रीवादळामुळे या पावसात भर पडण्याच्या चर्चांना सोशल मीडियावर ऊत आला आहे. मात्र राज्याला या चक्रीवादळाचा धोका नाही, असे प्रादेशिक हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.वारा खंडित प्रणालीमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ येथे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. या प्रणालीचा प्रभाव कोल्हापूर, सातारा, सांगली येथे मंगळवारीही जाणवण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला हा यलो अॅलर्ट हा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दिलेला इशारा असे समजून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभाग पुण्याचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी, राज्याला चक्रीवादळाचा धोका नसल्याचे स्पष्ट केले. ‘हे चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनाऱ्यापासूनही दूर सरकत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही’, असे ते म्हणाले. चक्रीवादळासंदर्भातील अद्ययावत माहिती हवामान विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात येत आहे. ती पाहण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

    चक्रीवादळाचा प्रवास

    ८ मे रोजी सकाळी ८.३० वाजता दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले.

    ९ मे रोजी याची तीव्रता वाढण्याच अंदाज.

    १० मे रोजी बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात ही प्रणाली चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता.

    त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर आणि वायव्येकडे ११ मेपर्यंत प्रवास करेल.

    चक्रीवादळ आपला मार्ग हळूहळू बदलून बांग्लादेश आणि म्यानमारच्या किनाऱ्याजवळ ईशान्य दिशेने जाण्याची शक्यता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed