संजय राऊत यांच्या गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात बैठका सुरु आहेत. अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्याच्या अटीवर संजय राऊत पक्षात जाण्यासाठी तयार आहेत. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांची भूमिका काय होती, ते पाहा. राऊत हे त्यावेळी सातत्याने अजित पवार यांच्याविरोधात बोलत होते. अजितदादांवर टीका करत होते. याचं कारण म्हणजे, संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अट घातली होती की, अजित पवार यांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षप्रवेश करतो. त्यामुळे संजय राऊत हे सातत्याने अजित पवार यांना लक्ष्य करत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.
संजय राऊत यांनी राष्ट्रवादीत कळवलं होतं की, आता उद्धव ठाकरे यांचे काही खरे नाही. त्यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही. ते मला पुन्हा खासदार करु शकत नाहीत. त्यामुळे आता मला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यात रस नाही. त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्या, असा प्रस्वात संजय राऊत यांनी मांडला होता. ज्यादिवशी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला, त्या दिवशीही संजय राऊत यांना त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसायचे होते. त्यासाठी संजय राऊत सकाळपासून शरद पवार यांना फोन करत होते. पण शरद पवार यांनी त्यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले होते, असे नितेश राणे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा डाव: नितेश राणे
या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर अनेक गंभीर आरोप केले. आम्ही उद्धव ठाकरे यांना कधीपासून सांगतोय की, संजय राऊत हा साप आहे. शिवसेनेत असताना त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडणं लावली. देशातील सर्व राष्ट्रीय नेत्यांनी फोन करुन शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण उद्धव ठाकरे यांनी पवारांना एकदा तरी तशी विनंती केल्याचे मला दाखवा. खरंतर उद्धव ठाकरे हे शरद पवारांना, ‘राजीनामा मागे घ्या’, हे सांगण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्यासोबत सिल्व्हर ओकवर जाणार होते. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होऊ शकली नाही. यामागे नेमकं काय षडयंत्र आहे. संजय राऊत ठाकरेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का? संजय राऊत चार-चार वेळा पवारांना भेटतात मग उद्धव ठाकरे यांना एकदाही शरद पवारांची भेट का मिळाली नाही, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.