उद्धव ठाकरे यांनी सोलगाव येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बारसू आणि सोलगावमधील ग्रामस्थांनी चिंता करु नये. आम्ही हा रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादू देणार नाही. सरकारने हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हुकूमशाही मोडून-तोडून काढू, महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे बारसू रिफायनरी विरोधकांना बळ मिळणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून आंदोलन स्थगित होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्यानिमित्ताने बारसूच्या सड्यावर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती. तर दुसरीकडे निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली बारसूमध्ये रिफायनरी समर्थकांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे पैसे घेतल्याशिवाय कोणताही प्रकल्प पुढे जाऊ देत नाहीत. ते कोकणाला लागलेला मोठा शाप आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच: उद्धव ठाकरे
लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही. रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिले. आता जे या प्रकल्पाचे समर्थन करत आहेत, त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला ठेवून समोर यावे आणि रिफायनरीचे समर्थन करुन दाखवावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे राजापूरमधील साखरीत दाखल; हेलिकॉप्टरमधून उतरताच ग्रामस्थांची गर्दी