• Sat. Sep 21st, 2024
ऊर्जा विभागात ‘राजकीय’ बदल्यांचे वारे; महावितरण, महापारेषणमध्ये महत्त्वाचा खांदेपालट

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्याच्या ऊर्जा विभागात राजकीय बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय संबंधातील व्यक्ती प्रामुख्याने संचालकपदी नियुक्त करून आधीच्या संचालकांना राजीनामा देण्यास सांगणे किंवा अन्यत्र बदली करणे सुरू आहे. याअंतर्गतच अलिकडे तीन महत्त्वाच्या बदल्या महावितरण व महापारेषणमध्ये करण्यात आल्या.

राज्यात सर्वाधिक वीज ग्राहक असलेली व देशातील सर्वात मोठी वीजवितरण कंपनी असलेल्या महावितरणच्या संचालक मंडळावर संचालक (मनुष्यबळ विकास) या नात्याने निवृत्त आयएएस अधिकारी डॉ. नरेश गीते सप्टेंबर २०२२ पर्यंत कार्यरत होते. जुलै महिन्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ते पद एप्रिल २०२३ पर्यंत रिक्त ठेऊन अन्य संचालक प्रसाद रेश्मे यांच्याकडे अतिरिक्त भार सोपविण्यात आला. सात महिन्यांनंतर सरकारने या पदावर अरविंद भादिकर यांची नियुक्ती केली.

संचालक (वाणिज्य) म्हणून डॉ. मुऱ्हारी केळे हे महावितरणमधील अधिकारीच कार्यरत होते. नोव्हेंबर महिन्यात डॉ. केळे यांना राजीनामा देण्यास सांगून नागपूरच्या योगेश गडकरी यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला. त्यावेळी डॉ. केळे यांना संचालकपदावरुन मुख्य अभियंता करण्यात आले. आता दोनच दिवसांपूर्वी संचालक (वाणिज्य) म्हणून योगेश गडकरी यांची नियुक्ती कायम करण्यात आली. महापारेषणमध्ये सध्या मुख्य अभियंता असलेले अनिल कोलप हे कंपनीचे संचालक (संचालन) होते. त्यांच्या कार्यकाळात पारषेण वाहिन्या सक्षमीकरणाचे काम सुरू झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी कोलप यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले व त्याजागी संदीप कलंत्री यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र कलंत्री अद्यापही यापदी प्रभारी म्हणून आहेत. त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती झालेली नाही, हे विशेष. दोनच दिवसांपूर्वी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे हे गृह विभागात प्रधान सचिव म्हणून रुजू झाले व त्याजागी संजीवकुमार यांनी महापारेषणचा पदभार स्वीकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed