• Sat. Sep 21st, 2024
नेते कार्यकर्त्यांच्या हट्टापुढे शरद पवार यांची माघार, राजीनामे मागे घेत असल्याची घोषणा

मुंबई : ‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेलं प्रेम आणि विश्वासाने मी भारावून गेलोय. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपल्या सर्वांनी केलेली आवाहने तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतलेला निर्णय जो माझ्यापर्यंत पोहोचवला गेला, या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे, असं सांगतच ज्येष्ठ शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. ते वाय बी चव्हाण प्रतिष्ठाण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी इच्छा होती. परंतु मी घेतलेल्या निर्णयाची जनमाणसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी, माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा, माझे हितचिंतक, निस्वार्थी प्रेम करणारे कार्यकर्ते, अससंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमताने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केलं. देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे, असं सांगतच ज्येष्ठ शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली.

नव्या जबाबदाऱ्या सोपवणार, नवीन नेतृत्व निर्माण करणार

मी पुनश्च: अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.

आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खस प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला ‘करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद…

समितीने एकमताने राजीनामा फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केला. राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी शरद पवारच कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामूहिक भावना आहे. त्यामुळे लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी गठित केलेल्या निवड समितीच्या सदस्यांनी खुद्द पवार यांच्याकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed