• Mon. Nov 25th, 2024
    पत्रकार परिषदेला दांडी, पण शरद पवारांच्या निर्णयावर अजितदादा बरंच बोलले!

    मुंबई : शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेताना राष्ट्रवादीचे सगळे नेतेमंडळी झाडून हजर होते. पण पवारांच्या राजीनाम्याला पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांनी मात्र या ऐतिहासिक पत्रकार परिषदेला दांडी मारली होती. त्यांच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवार यांनीही वेगळा अर्थ काढू नका म्हणत स्पष्टोक्ती दिली. अखेर अजित पवार यांनी या साऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

    शरद पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि साहेबांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

    सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी

    शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

    आदरणीय साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशिरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर उद्या ६ तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. ७ तारखेला बारामती, ८ तारखेला कोरेगाव, सातारा, ९ तारखेला सातारा, फलटण, १० तारखेला उस्मानाबाद, लातूर, ११ तारखेला नाशिक आणि १२ तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *