शरद पवार यांनी माघारीची घोषणा करताच जयंतरावांनी क्षणाचाही विलंब न लावता एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन करताना जयंत पाटील म्हणाले, “आदरणीय शरद पवारसाहेब यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन मी करत आहे…”
शरद पवार निवृत्तीची घोषणा मागे घेताना काय म्हणाले?
‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेलं प्रेम आणि विश्वासाने मी भारावून गेलोय. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपल्या सर्वांनी केलेली आवाहने तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतलेला निर्णय जो माझ्यापर्यंत पोहोचवला गेला, या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे.
