मिळालेल्या माहितीनुसार, मृत अशोक येडपुडे हा मजूरीचं काम करत होता. तो तेथे त्याच्या दोन मामांसोबत राहत होता. त्याच्या आईचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. रोजप्रमाणे मंगळवारीही मृत अशोक आपले काम आटोपून विश्रांतीसाठी घरी पोहोचला आणि तो जेवण करुन आराम करत होता. त्यानंतर अचानक दुपारी पावसाला सुरुवात झाली. कच्च्या घरामुळे छप्पर खाली पडले आणि त्यात अशोकचा दबला गेल्याने मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढून उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, उपराजधानीत अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत घरांची पडझड होऊन त्याखाली दबून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या महिन्यात मंगळवारी घरावर झाड पडल्याने आई-मुलाचा मृत्यू झाला होता. यानंतर बेसा येथेही टिनाच्या शेड कोसळल्याने पत्नी आणि पतीला आपला जीव गमवावा लागला आहे. तर आज छत कोसळल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहणार आहे. विभागाने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ४ मेपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर उन्हाळा असूनही तापमानात लक्षणीय घट झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.