सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा विजय मिळवल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाची धूळधाण मतदारांनी केली आहे. फक्त पद भोगायची, मात्र लोकांची काम करायची नाहीत. यामुळंच मतदारांनी त्यांना नाकारलं असून उदयनराजेंचा मार्केट कमिटीची जागा हडपण्याचा डाव आम्ही हाणून पाडल्याचं ही शिवेंद्रराजे म्हणाले.
आगामी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत अशाच पद्धतीनं उदयनराजेंना हद्दपार करू, त्यांचा भ्रष्टाचारी कारभार लोकांनी बघितलाय,असा इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. तर उदयनराजेंची ताकत ही आता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना कळाली असून या निवडणुकीनंतर खासदारकीच्या संदर्भात भाजपाचे वरिष्ठच निर्णय घेतील, असंही शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच वर्चस्व राहिलं आहे. ३५ वर्षानंतर निवडणूक होऊन ही सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे राहिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उदयनराजे भोसले यांच्या गटाला धूळ चारत १८ जागांवर शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनलनं विजय मिळवला.
विशेष बाब म्हणजे उदयनराजे भोसले यांच्याकडून या निवडणुकीत अधिकृतपणे पॅनल उभं करण्यात आलं नव्हतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या ठिकाणी निवडणूक लढवली होती. त्याला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलसाठी उदयनराजे भोसलेंनी पत्रकार परिषद देखील घेतली होती.
साताऱ्यात राजकीय संघर्ष वाढणार?
सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांना इशारा देण्यात आला आहे. आता उदयनराजे भोसले काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.