• Mon. Nov 25th, 2024

    सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या रिल्सचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते अनावरण

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2023
    सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या रिल्सचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते अनावरण

    ठाणे, दि. 1 (जिमाका) – सध्या समाजमाध्यमांवर रिल्सची क्रेझ वाढली आहे. विशेषतः तरुणांमध्ये रिल्स लोकप्रिय आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अशा प्रकारच्या रिल्सच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्याचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या रिल्सचे अनावरण ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज झाले. रिल्सच्या माध्यमातून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे श्री. शिनगारे यांनी सांगितले.

    यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, प्र. जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे आदी उपस्थित होते. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरून हे रिल्स प्रसिद्ध केले जाणार आहेत.

    जिल्हा नियोजन समितीच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांना निधी वितरित करण्यात आला होता. सन 2022-23 या वर्षाच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालय ठाणे यांनी विविध उपक्रमाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिद्धी केली. यामध्ये जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लोककला, पथनाट्याच्या माध्यमातून योजना पोचविण्यात आल्या. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण ठाणे कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 10 महाविद्यालयांमध्ये एकदिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे अनेक योजनांची माहिती नव्याने झाली असून करिअरची पुढील दिशा ठरविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरण्याचे मत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले होते. ठाणे जिल्ह्यात प्रथमच महाविद्यालयात जाऊन प्रदर्शन भरविण्यात आले होते.

     

    काय आहे रिल्समध्ये?

    प्रसिद्धी मोहिमेचा भाग म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिद्धी समाज माध्यमातून करण्यासाठी रिल्सचा वापर करण्याचे नियोजन जिल्हा माहिती कार्यालयाने केले. अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गासाठी असलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, यूपीएससीच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी आर्थिक मदत, स्टँडअप इंडिया, शेतकऱ्यांना मिनि ट्रॅक्टर, रमाई आवास योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुलींसाठी असलेल्या  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत या योजनांचे रिल्स तयार करण्यात आले. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने केलेला राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

    जिल्हा माहिती कार्यालयाने राबविलेले उपक्रम अतिशय उपयुक्त आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचल्यास त्या योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल. अधिकाधिक योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed