• Mon. Nov 25th, 2024

    जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2023
    जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

    ठाणे, दि. 01(जिमाका) – महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते साकेत येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात झाले. यावेळी उपस्थित मान्यवर, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आदी यावेळी उपस्थित होते.

    महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याची झपाट्याने प्रगती होत आहे. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राहिलेले राज्य आहे. कृषि, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण , आर्थिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने आपला नावलौकिक मिळवला आहे.  महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्या राज्याचा वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे गाठण्याचा निर्धार  सर्वांनी करावा.

    राज्याच्या विकासात ठाणे जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. जिल्ह्यात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. तसेच रस्ते, उड्डाणपूल आदींची कामेही सुरू आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर दिला जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी 900 बेडचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. तसेच आजपासून जिल्ह्यात 9 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होत आहेत, असेही श्री. शिनगारे यांनी सांगितले.

    नागरिकांना आपले घर बांधण्यासाठी माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आजपासून अंमलात आणले आहे. जिल्ह्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    राज्य शासनाच्या विविध रिक्त पदांसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 10 उमेदवारांना यावेळी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते नियुक्तीची शिफारसपत्रे देण्यात आली. यामध्ये राज्य कर निरीक्षक व राज्य सुरक्षा रक्षक मंडळातील उमेदवारांचा समावेश होता.

    या कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर पहिल्यांदाच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही पोलीस दलाच्या बँड पथकाने वाजविले. यावेळी झालेल्या संचालनालनात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड, पोलीस आयुक्तालय, जिल्हा ग्रामीण पोलीस, पोलीस बँड पथक, अग्निशामक दल, ठाणे महापालिका सुरक्षा रक्षक दल, रुग्णवाहिका आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी चारुलता धानके यांनाही विशेष पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. 

    जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

    महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, तहसीलदार युवराज बांगर, दिनेश पैठणकर आदी यावेळी उपस्थित होते. ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed