शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार किशोर पाटील हे उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील तात्या यांची मुलगी वैशाली सूर्यवंशी या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. वैशाली सूर्यवंशी या पहिल्यांदाच विकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे गेल्या.
पाचोरा बाजार समितीवर आमदार किशोर पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी नऊ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केल आहे. या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या विरोधात बहीण तथा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आव्हान दिल होतं. त्यांच्या पॅनेलनं ७ जागांवर विजय मिळवला.
बाजार समितीची रणधुमाळी सुरू असतानाच या ठिकाणी दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे हे पाचोरा शहरात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांची पाचोरा शहरात भव्य सभा झाली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या पाठीशी उभा राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं.
या पाचोरा बाजार समितीत आज मतमोजणी पार पडली. यात पाचोरा बाजार समिती येथे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात सेनेचे शेतकरी विकास पॅनल, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे महाविकास पॅनल तर तर भाजपचे नेते अमोल शिंदे यांचे भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनल शेतकरी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांना त्यांच्या ठाकरे गटातील बहीण वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कडवं आव्हान दिलं.
बाजार समितीच्या मतमोजणीत शेवटपर्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. यात किशोर पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलने नऊ जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला सात जागांवर उमेदवार विजयी झाले. तर, भाजप पुरस्कृत अमोल शिंदे यांच्या शेतकरी सहकारी पॅनलला दोन जागांवर विजय मिळाला.
किशोर पाटील यांच्या पॅनलला ९ जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना बहुमताचा आकडा मिळवण्यासाठी अजून एका जागेची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला सात जागा मिळाल्याने अमोल शिंदे यांच्या भाजप पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनलच्या विजयी झालेल्या दोन उमेदवारांचं महत्त्व वाढलं आहे. बहुमताचा १० चा आकडा कोण गाठणार हे पाहावं लागणार आहे.