• Mon. Nov 25th, 2024

    जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    ByMH LIVE NEWS

    Apr 29, 2023
    जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

            पुणे, दि. २९: जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करुन नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

            पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा स्वयंसेविका पुरस्कार आणि कायाकल्प बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

            कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे सेवा देऊन संकटातून बाहेर काढले, असे गौरवोद्गार काढून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना संकटात सेवा बजावताना जिल्ह्यातील ३८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानाची दखल घेत त्यांचे जिल्हा परिषदेत येथे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

           निष्ठापूर्वक करीत असलेल्या कार्याची दखल बक्षिसाच्या स्वरूपात घेतली जाते असे सांगत श्री. पाटील यांनी पुरस्कार प्राप्त आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहू, अशीही ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

          राज्याच्या संस्कृतीला शोभेल असे आरोग्य विभागाचे कार्य – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

    आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्र राज्याची कठीण प्रसंगात त्यागाची, बलिदानाची परंपरा असून कोरोनाच्या महामारीच्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राज्याच्या संस्कृतीला शोभेल असे काम आरोग्य विभागाने केले आहे. कोरोनाच्या काळात बलिदान दिलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आशा स्वयंसेविका आदींना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

          राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी स्वतंत्र आस्थापना स्थापन करण्यात येणार आहे.

          आरोग्य विभागातर्फे राज्यात १८ वर्षावरील महिला,  गरोदर स्त्रीया, माता यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ आणि शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. विभागाने घेतलेल्या निर्णयांची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. अशा अभियानामुळे राज्याचे आरोग्य पत्रक आपल्या समोर येईल आणि त्यानुसार आगामी काळात काम करावे लागणार आहे.

            महाराष्ट्र हे पुरोगामी, प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. रुग्णाला योग्य पद्धतीने आरोग्य सेवा देऊन त्यांचे समाधान केले पाहिजे. आपण आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडत असून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे  आहे. आपल्या मागण्या व अडीअडचणीबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले.

    जिल्हा परिषद देशात अव्वल स्थानी येण्यासाठी प्रयत्न- मुख्य कार्यकारी अधिकारी

             श्री. प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’   अभियानाअंतर्गत सुमारे ९ हजार महिलांची तसेच ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियानाअंतर्गत बालकांचीही आरोग्य तपासणी केली आहे. जिल्ह्यात ३ लाख २८ हजार बालकांपैकी १६९ बालके कुपोषित आहेत. त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने शासनाच्या योजना राबविण्यावर भर देणार आहे. येत्या काळात जिल्हा परिषद देशात अव्वल येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. प्रसाद यांनी सांगितले.

            यावेळी २०२२-२३ आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली, ता. हवेली (प्रथम क्रमांक), प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडवगण फराटा, ता. शिरुर (द्वितीय क्रमांक), आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, केंदूर, ता. शिरुर (तृतीय क्रमांक) यांचा तसेच तालुकास्तरीय प्रथम व द्वितीय पुरस्कार देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचा सन्मान करण्यात आला.

            आशा स्वयंसेविका पुरस्कार अंतर्गत हवेली तालुक्यातील वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  आशा स्वयंसेविका मयुरी रवी पवार यांना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, शिरूर तालुक्यातील रांजणगाव प्राथ. आरोग्य केंद्राच्या शोभा सोनबा खेडकर यांना द्वितीय क्रमांक, पासली प्राथ. आरोग्य केंद्राच्या (ता. वेल्हा) राणी बापू जोरकर यांना जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार तर तळेगाव ढमढेरे प्राथ. आरोग्य केंद्राच्या (ता. शिरूर) आरती अमोल घुले यांना जिल्हास्तर प्रथम गट प्रवर्तक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच आशा स्वयंसेविकांना तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय पुरस्कारही वितरित करण्यात आले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed