या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात राहणारे गणेश बडे (वय ३३) असं मारहाण झालेल्या शासकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, मंगळवार दि.२६ रोजी रात्री गणेश हे शासकीय कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. पुण्याला जाण्यासाठी बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये बसची वाट बघत ते उभे होते. यावेळी एक तरुण त्या ठिकाणी आला आणि गणेश यांच्या जवळ जात “कुठे जायचं आहे? इरटीगा गाडीमध्ये चला”, असा प्रश्न गणेश यांना तरुणाने केला. यावेळी गणेश बडे यांनी त्याला नकार दिला. नकार दिल्यानंतरही तो मुलगा बडे यांना बळजबरी करू लागला. नंतर त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. तो एवढ्यावर न थांबता त्याने आणखी काही साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर गणेश यांना लाथाबुक्क्यांनी, कंबरेच्या बेल्टने मारहाण करत बाबा चौकात धिंगाणा घातला.
टवाळखोर एजंट गणेश बडे यांना मारहाण करत असताना काहींनी बडे यांच्या खिशातील पैसे, मोबाईल आणि हातातील अंगटी हिसकवली. हा संपूर्ण प्रकार बाबा चौकात घडल्यानंतर बडे यांनी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ट्रॅव्हल्स चालक आणि रिक्षा चालकांच्या दादागिरीला शहरातील प्रवासी त्रस्त झाले आहेत. यामुळे या टवाळकर रिक्षा चालक आणि ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींमधून विचारला जात आहे.