• Mon. Nov 25th, 2024

    शरद पवार म्हणाले, भाकरी फिरवणार, पुढच्या काही तासातच रोहित पवारांची मोठ्या पदावर शिफारस!

    शरद पवार म्हणाले, भाकरी फिरवणार, पुढच्या काही तासातच रोहित पवारांची मोठ्या पदावर शिफारस!

    मुंबई: आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेय, नाहीतर ती करपेल. त्यामुळे उशीर करुन चालणार नाही, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंथन कार्यक्रमात केले. त्यामुळे जुन्या जाणत्या नेत्यांना जरासं बाजूला सारुन युवा नेत्यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यांच्या या वक्तव्याला २४ तास उलटत नाही तोच त्याची प्रचिती आलीये ती रोहित पवारांना मिळणार असल्याच्या गिफ्टने…!

    राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्वाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने तरुण आणि पहिल्याच टर्मचे आमदार रोहित पवार यांचे नाव सुचवलं आहे. राष्ट्रवादीत बरीच दिग्गज नावं असूनही कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवारांचं लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव सुचल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. पक्षातील अन्य ज्येष्ठ नेते मंडळींना बाजूला करून थेट रोहित यांचे नाव सुचविण्यात आल्याने राष्ट्रवादीने खरंच भाकरी फिरली, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

    लोकलेखा समिती काय आहे?

    पीएसी म्हणजेच लोकलेखा समिती
    ही राज्य विधिमंडळातील सर्वात महत्वाची समित्यांपैकी एक समिती आहे
    या समितीत विधानसभेचे वीस आणि विधान परिषदेचे पाच सदस्य असतात
    पीएसी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या अहवालांची छानणी करते
    या समितीचे प्रमुख सहसा विरोधी पक्षातील आमदार असतात.

    पक्ष गिफ्ट देण्याच्या तयारीत, रोहितदादा म्हणाले…..

    ठाकरे सरकार जाऊन शिंदेंच्या नेतृत्वाखालचं सरकार येऊन जवळपास नऊ महिने उलटले होते तरीही लोकलेखा समितीची स्थापना झालेली नव्हती. त्यानंतर आता ही समिती पुर्नगठीत करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. जर पक्षाने मला जबाबदारी देण्याचे ठरवलेच असेल तर मी राज्याच्या भल्यासाठी माझे कर्तव्य पार पाडील, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.

    शरद पवार काय म्हणाले होते?

    मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवकने युवा मंथन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शरद पवार प्रमुख पाहुणे होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हणाले, समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्ही पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवा. वरच्या टप्प्यात कुणा-कुणाला आणायचं त्याचा विचार करा. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्यावतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून नवे नेतृत्व उभा राहीन. भाकरी फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed