• Sat. Sep 21st, 2024

अपघात रोखण्याचा भन्नाट मार्ग; वाहनचालकांना मिळणार ‘ब्लॅकस्पॉट’चे अलर्ट, असा आहे प्रकल्प

अपघात रोखण्याचा भन्नाट मार्ग; वाहनचालकांना मिळणार ‘ब्लॅकस्पॉट’चे अलर्ट, असा आहे प्रकल्प

[email protected]

नाशिक :
वाढत्या रहदारीबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढत असून, अनेक ठिकाणी सातत्याने दुर्घटना घडत असतात. अशी ठिकाणे ‘ब्लॅकस्पॉट’ म्‍हणून निश्चित केली जातात. चालकांनी वाहने चालविताना सावधगिरी बाळगल्यास या ठिकाणांवर अपघातांचा धोका कमी होतो. वाहनचालकांना ‘ब्लॅकस्पॉट’चे अलर्ट मिळावेत, यासाठी ‘मविप्र’च्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मोबाइल ॲप विकसित केले आहे.

दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक समस्या उभ्या राहतात. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्यापासून अपघाताच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. प्रामुख्याने काही नैसर्गिकरित्या धोकादायक असलेली वळणे, चौफुली किंवा उताराचा रस्ता अशा विविध ठिकाणांवर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर येते. प्रशासकीय यंत्रणेकडून अशा ठिकाणांना ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून निश्चित केले जाते. परंतु, याविषयी सर्वसामान्य चालकांना माहिती नसल्याने निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण कमी करणे आव्हानात्मक ठरते. परंतु, अशा ब्लॅकस्पॉटबाबत वाहनचालकांना सतर्क करताना अपघात रोखण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने ‘मविप्र’ संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी ॲप विकसित केले आहे. डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील आयटी शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘ब्लॅकस्पॉट डिटेक्शन’ प्रकल्प तयार केला.

…यांनी तयार केला प्रकल्प

संजीवनी खैरनार, कशीश डांगे, प्रतीक संकपाळ, कुणाल साळुंखे या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रकल्पासाठी पॉलिटेक्निकच्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील, प्रकल्प समन्वयक अजित पाटील, मार्गदर्शक स्नेहल राजोळे, विभाग प्रमुख माधुरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात या प्रकल्पाचा वापर अन्य शहरांमध्ये, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्याचा मानस या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

…असा आहे प्रकल्प

– प्रकल्पात वेब व मोबाइल ॲप्लिकेशन आहे.

– वापरकर्त्याला लोकेशन मॅपनुसार ‘ब्लॅकस्पॉट’बाबत माहिती दिली जाते.

– चालकाला ‘व्हॉइस अलर्ट’द्वारे सतर्कतेचा इशारा दिला जातो.

– यामुळे वेळीच सावधगिरी बाळगणे सोपे होते.

– पोलिस प्रशासनालाही अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ॲपचा उपयोग होईल.

तुमच्याकडील इनोव्हेशन पाठवा…

शाळा कॉलेजांपासून ते स्टार्टअप, मोठ्या लॅबपर्यंत सगळीकडे सतत संशोधन, नवकल्पना राबविल्या जात असतात. आपणही अशी काही नवीन संकल्पना अंमलात आणली असेल, काही संशोधन केलेले असेल तर ‘मटा’कडे पाठवा. योग्य संशोधनास प्रसिद्धी दिली जाईल. आपल्या संशोधनाची माहिती मराठीमध्ये टाइप करून [email protected] या ईमेल आयडीवर पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed