छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवनेरीशी असलेलं नाते, या दुर्मीळ वनस्पतीचा याच किल्ल्यावर लागलेला पहिला शोध, तिचा प्रामुख्याने सह्याद्रीच्या गड-कोटांवर असलेले अस्तित्व आणि फुलांचा लालसर भगवा रंग लक्षात घेऊन पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी ‘फ्रेरिया इंडिका’ला शिवसुमन हे नाव देण्याची कल्पना काही वर्षांपूर्वी मांडली. शिवभक्त आणि वनस्पती अभ्यासकांनी त्याला दुजोरा दिला. त्यामुळे बायोस्फिअर्स, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीसह विविध संस्थांनी एकत्र येऊन २०१९मध्ये शिवराज्याभिषेकदिनी रायगडावर ‘फ्रेरिया इंडिका’चे ‘शिवसुमन’ असे नामकरण केले.
शिवसुमन ही रुई कुळातील वनस्पती. तिचे खोड मांसल असते. तिला केवळ पावसाळ्यातच पाने असतात. पाऊस संपत आला की खोडांवर लालसर तपकीरी रंगाची फुले दिसायला लागतात. फुलांवर भगव्या-पिवळ्या रंगाची नक्षी असते. त्यांचा आकार सुदर्शन चक्र किंवा पंचकोनी ताऱ्यासारखा दिसतो. पाऊस ओसरला, की फक्त खोड शिल्लक राहते. एरवी कड्यावर वाळलेल्या इतर गवतामध्ये ही वनस्पती लक्षातही येत नाही. काही वर्षांत नैसर्गिक आणि मानवी हस्तक्षेपामुळे ‘शिवसुमन’ संकटात सापडले आहे. वणवे, वनक्षेत्रांवरील अतिक्रमण, भूस्खलन, ढासळणाऱ्या कड्यांमुळे तिचा अधिवास धोक्यात आला आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेबरोबरच, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरर्व्हेशन ऑफ नेचर (आय़यूसीएन) या संस्थेने जगातील अतिदुर्मीळ वनस्पतींच्या यादीत तिचा समावेश केला आहे. डॉ. पुणेकर यांची बायोस्फिअर्स संस्था सध्या ‘शिवसुमन’ संवर्धनाचे काम करते आहे.
पुणे जिल्ह्याचे प्रतीकात्मक फूल
बायोस्फिअर्स संस्थेने काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक अशा विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारी पुण्याची मानचिन्हे निवडली होती. यासाठी सर्वसामान्य लोकांबरोबरच विद्यार्थ्यांनी केलेल्या मतदानात पुणे जिल्ह्याचे निसर्ग प्रतीकात्मक फूल म्हणून शिवसुमनला सर्वाधिक मते मिळाली. दुर्मीळ शिवसुमन वनस्पती आणि शिवनेरी किल्ल्याचा सन्मानासाठी टपाल विभागाने २०२१मध्ये ‘शिवयोग’ या संकल्पनेवर आधारित विशेष पाकिट प्रसिद्ध केले होते. यावर शिवनेरी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसुमनचे माहितीसह फोटो प्रसिद्ध केले आहेत.
औषधी उपयोग
‘शिवसुमन फुलपाखरांची आवडती वनस्पती असून प्रामुख्याने प्लेन टायगर आणि पेंटेंड टायगर ही फुलपाखरे तिच्यावर अवलंबून असतात. स्थानिक लोकांकडून ‘शिवसुमन’ची पाने, खोडाचा आहारात, जखम लवकर बरी करण्यासाठी, केसांच्या वाढीसाठी वापर केला जातो. काही गावांमध्ये तिला रानभाजी म्हणतात. तर काही ठिकाणी शिंदळ माकुडी नावाने ओळखतात,’ असे डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले.
मूळ अधिवास असलेल्या गडकिल्ल्यांवर आम्ही ‘शिवसुमन’ची लागवड करत आहोत. आतापर्यंत रायगड, सज्जनगडावर रोपे लावली असून, इतर किल्यांवरही अनुकरणाचा विचार आहे. हरिश्चंद्रगड, सज्जनगड, पुरंदरसह प्रत्येक ठिकाणी या फुलांचा आकार, रंगात विविधता दिसते. त्यामुळे रोपण करताना आम्ही कटाक्षाने ज्या भागातील वनस्पतीची रोपे केली तिथेच त्यांची लागवड करत आहोत.
– डॉ. सचिन पुणेकर, पर्यावरण शास्त्रज्ञ