• Sat. Sep 21st, 2024

सातपुडाच्या पर्वतरांगांत सापडले पुरातन शिवलिंग; २० फूट उंच, वैदिक काळापूर्वीचे असल्याचा दावा

सातपुडाच्या पर्वतरांगांत सापडले पुरातन शिवलिंग; २० फूट उंच, वैदिक काळापूर्वीचे असल्याचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नागपूरःअमरावतीपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतराजींमध्ये इतिहास अभ्यासकांनी पुरातन शिवलिंगाचा शोध लावला आहे. हे शिवलिंग वैदिक काळापूर्वीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अमरावतीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. व्ही. टी. इंगोले यांच्या नेतृत्वातील चमूने हे शिवलिंग शोधून काढले आहे.सातपुडा पर्वतराजीत २००७ मध्ये इंगोले यांच्या नेतृत्वाखाली चमूने अश्मयुगीन चित्रगुहांचा सर्वप्रथम शोध लावला होता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील या परिसरात अनेक चित्रगुहा आहेत. त्यापैकी एका चित्रगुहेत शिवलिंग आढळले आहे. या चमूने शोधलेले शिवलिंग हे नैसर्गिक स्वरूपात तयार झाले असून सुमारे २० फूट उंचीचे आहे.

‘आमच्या चमूने केलेल्या अभ्यासादरम्यान त्यांना २०१२मध्ये हे शिवलिंग आढळून आले होते. मात्र, त्याची प्रसिद्धी केल्यास आणि लोकांना त्या जागेची माहिती मिळाल्यास त्या जागेचे आणि शिवलिंगाचे नुकसान होऊ शकते, या भावनेने आम्ही त्याबाबतची माहिती पुढे आणली नाही. आता पहिल्यांदा आम्ही ही माहिती जाहीर करतो आहे. या शिवलिंगावर लाल रंग आढळला आहे. तो रंग पूजेकरिता वापरला गेला असावा. वैदिकपूर्व काळात शिवलिंग पूजा होत होती. या दगडांचा कालावधी बघता हे शिवलिंग वैदिकपूर्व काळातील असावे या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत. आम्ही शोध घेतपर्यंत हे ठिकाण अज्ञातच होते,’ अशी माहिती डॉ. इंगोले यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

याच चित्रगुहेतील दगडावर कालभैरवाचे नृत्य करतानाचे चित्रही रेखाटले आहे. तसेच जवळील एक शैलगृहात पांढऱ्या रंगातील ‘ॐ’ आकृती आहे. याबाबतचे आमचे संशोधन हे संक्षिप्त असून, ते खोलवर आणि व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे, असेही डॉ. इंगोले म्हणाले. अमरावतीच्या या संशोधक चमूमध्ये वन्यजीव लेखक प्र. सु. हिरुरकर, पद्माकर लाड, डॉ.मनोहर खोडे, कुमार पाटील आणि दिवंगत ज्ञानेश्वर दमाहे यांचा समावेश आहे.

३५ हजार वर्षांपूर्वीचे शहामृग चित्र

डॉ. व्ही. टी. इंगोले यांच्या चमूने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर अश्मयुगीन चित्रगुहांचा शोध लावला होता. या परिसरातील मुंगसादेव नावाच्या चित्रगुहेतील शहामृग पक्ष्याचे चित्र आढळले होते. इंगोले यांनी या चित्राचा अभ्यास करून शोधनिबंध सादर केला. त्यामुळे या चित्रगुहेतील चित्रांचा कालावधी सुमारे ३५ हजार वर्षांपूर्वीचा असावा, याला अनेक संशोधकांनी मान्यता दिली आहे. भारतातील त्या काळातील ही अश्मयुगीन मानवाची सर्वांत मोठी आणि प्राचीन वसाहत असू शकते. या भागात अश्मयुगीन, कांस्ययुगीन वसाहती आढळून आल्या आहेत. कोरीव आणि गेरव्या व पांढऱ्या रंगातील चित्रे तेथे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed