• Sat. Sep 21st, 2024

कोणाचा कंडका पडणार? राजाराम कारखान्याची मतमोजणी सुरू; सतेज पाटील, महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

कोणाचा कंडका पडणार? राजाराम कारखान्याची मतमोजणी सुरू; सतेज पाटील, महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

कोल्हापूर :श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत यंदा ९१.१२ टक्के चुरशीने आणि अटीतटीने मतदान पार पडले. गेल्या निवडणुकीपेक्षा एक टक्क्याने मतदान वाढले असून मतदार राजा कोणाला सत्तेत आणणार आणि कोणाचा कंडका मोडणार? हे आज स्पष्ट होणार आहे.दोन अपक्षांसह एकूण ४४ उमेदवार रिंगणात

बहुचर्चित अशा श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी ही अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी चुरशीने व अटीतटीने पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसबा बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात दोन फेरीमध्ये २९ टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले २९ आणि दुसऱ्या टप्प्यतात पुढील ३० ते ५८ या केंद्रांची मतमोजणी होणार आहे.

राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील २० अशा २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी दोन अपक्षांसह एकूण ४४ उमेदवार रिंगणात आहेत. तर दुपारपर्यंत निकालाचे कल हातात येण्याची शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दोन्ही गटातील सभासद आणि उमेदवारांना वेगवेगळी जागा नेमून देण्यात आली आहे. परिसरात १४४ कलम म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

छत्रपती राजाराम कारखान्याच्या मतदारांचा कौल मतपेटीत बंद? पाटील की महाडिक, कोण बाजी मारणार, उत्सुकता शिगेला
दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

जिल्ह्यात माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष नेहमीच चर्चेत आहे. लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद आणि गोकुळ दूध संघात सतेज पाटील यांनी महाडिकांना शह देत हातातून काढून घेतले. तर आता गेल्या ३० वर्षांपासून राजाराम सहकारी साखर कारखान्यावर वर्चस्व असलेल्या महादेवराव महाडिक यांच्या हातातून कारखाना काढून घेण्यासाठी सतेज पाटील यांनी चांगलीच ताकद लावली होती. तर कोणत्याही परिस्थितीत कारखाना हातातून सोडायचा नाही म्हणत महाडिक परिवार ही मैदानात उतरल होतं.

चंद्रकांत पाटलांकडून ठाकरेंच्या बांधावरच्या दौऱ्याचं पोस्टमार्टेम, म्हणाले, ‘शेतकरी त्यांच्या वक्तव्यावर हसले’
गेल्या १५ ते २० दिवसांपासून सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. सभासद अपात्र आणि त्यांनतर ऐन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी दोन्ही गटाकडून बिंदू चौकात येण्याचे आव्हान देत गोंधळ निर्माण करण्यात आला. यामुळे ही लढत अधिक रंगतदार झाली होती. यामुळे मतदार राजाने देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होत ९१.१२ टक्के असे चुरशीने मतदान केले आहे. यामुळे दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पॅनलमधील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदार राजाने आपलं बहुमूल्य मत हे कोणाला दिले आहे? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

मतदारराजा जागरुक

राजाराम कारखान्याची सत्ता ही महाडिक गटाकडे राहिलेली. जिल्हा पातळीवरील एकमेव सत्ता आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महाडीक गट बॅकफुटवर गेला आहे. तर ही सत्ता उलथवून लावण्यासाठी सतेज पाटील यांनी कंबर कसली होती. या निवडणुकीत दोन्ही गटाकडून यंत्रणा राबवण्यापासून रोजची जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रक्कम वाटप झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. आधी एका गटाने पाच हजार दिले, ते दुसऱ्या गटाला समजल्यावर त्यांनी दहा दिले. मग पहिल्या गटाने आणखी दहा हजार मताला दिले, असे अनेक गावांत घडले. मतदारांनी दोघांकडून पैसे घेतले. मात्र मतदाराने जागरूकपणे मतदान केला असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed